बेळगाव लाईव्ह : बहुप्रतीक्षित असणाऱ्या बेळगावमधील शासकीय सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन लवकरच करण्यात येणार आहे अशी माहिती बेळगाव जिल्हा रुग्णालयाचे संचालक अशोक कुमार शेट्टी यांनी दिली.
बेळगावच्या नागरिकांना एकाच छताखाली दर्जात्मक आणि सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुपरस्पेशालिटी रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. मात्र हे रुग्णालय अद्याप उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असून यासाठी नागरिकांमधूनही मागणी वाढू लागली आहे.
दरम्यान काही तांत्रिक अडचणींमुळे थांबलेल्या बेळगाव सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे लवकरच उद्घाटन होणार असल्याची माहिती अशोक कुमार शेट्टी यांनी दिली.
सदर रुग्णालयासाठी १४० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरी आणि इंडो-क्रोनोलॉजी विभाग आहेत. दुसऱ्या मजल्यावर गॅस्ट्रोलॉजी, नेफ्रोलॉजी, सर्जिकल गॅस्ट्रोलॉजी विभाग आहेत.
व्हीआयपी कक्ष आणि जनरल रूम तिसऱ्या मजल्यावर असून ऑपरेशन थिएटर चौथ्या मजल्यावर आहे. या रुग्णालयात प्रसूती विभागात बरेच बदल करण्यात आले आहेत.
बाळ आणि बाळंतिणीसाठी गरम पाण्याची सोय, रुग्णालयाची स्वच्छता याकडे बारकाईने लक्ष देण्यात अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने रचना केलेल्या या रुग्णालयासाठी अग्निशमन दलाच्या परवानगीची गरज असून अग्निशमन दलाकडून परवानगीचे पत्र मिळाल्यानंतर रुग्णालयाच्या उदघाटनाला हिरवा कंदील मिळणार आहे.
जनतेला दर्जेदार आणि माफक दरात आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने या रुग्णालयाची स्थापना करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत जनतेला सर्वसोयींनीयुक्त रुग्णालयात आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी
यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णालयाने सर्व सुविधांचा अवलंब केला असून केवळ बेळगावच नाही तर शेजारील गोवा आणि महाराष्ट्रातील रुग्णांसाठीही याठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध असतील, असे अशोक कुमार शेट्टी म्हणाले.