बेळगाव लाईव्ह : उघड्या छताखाली बारमाही व्यवसाय करणारा, काळी माती जमीन आणि पांघरायला आकाश अशा परिस्थितीत आपल्या लेकराप्रमाणे पिकाला जपणारा तो शेतकरी!
कधी अतिशय उन्हाचा तडाखा पडल्याने होणारा कोरडा दुष्काळ तर कधी अतिवृष्टीने ओल्या दुष्काळात होरपळून जाणारा शेतकरी! आपल्यावर येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करत जगण्याला महत्व मिळवून देणाऱ्या शेतकऱ्याच्या कल्पनाही सुपीक जमिनीप्रमाणेच असतात. बेळगावच्या शेतकऱ्यानेही अशाच पद्धतीने उन्हाळी पिकात भरघोस उतपादन मिळवून शेतकऱ्यांसमोर नवे उदाहरण ठेवले आहे.
बेळगाव शहराच्या पाण्याचा निचरा करणारा नाला म्हणून बळ्ळारी नाल्याची ख्याती आहे. परंतु पावसाला सुरुवात झाल्यानंतर हा नाला तुडुंब भरतो आणि आसपासच्या शेतजमिनीत पाणी शिरते. या भागातील शेतजमीन या नाल्याच्या पाण्यामुळे भरून जाते.
पिके खराब होतात. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरावा असा नाला असूनही पावसाळ्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीमुळे हा नाला शेतकऱ्यांसाठी शाप ठरत आला आहे. मात्र याच नाल्याच्या परिसरात असणाऱ्या शेतजमिनीत शेतमालक जाधव यांनी भरघोस उन्हाळी भातपीक घेतले आहे.
या शेतकऱ्याने एक एकरात बासमती भात पिकवलेले आहे. स्वतःच्या कूपनलिकेतील पाण्याचा वापर करत, ८ ते १० दिवसातून एकदा पिकाला पाणी सोडत भरघोस उन्हाळी पीक घेत आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी असा प्रयोग करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. उन्हाळ्यात देखील भातपीक घेता येऊ शकते याचे उदाहरण या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे.