बेळगाव लाईव्ह:शिक्षण खात्याने यंदाच्या दहावी पुरवणी परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले असून त्यानुसार ही परीक्षा येत्या 14 ते 22 जून 2024 या कालावधीत पार पडणार आहे.
यावर्षी दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्यामुळे 15 मे पासून अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग घेण्याची सूचना करण्यात आली होती.
मात्र शिक्षण खात्याच्या सूचनेमुळे शिक्षकांच्या उन्हाळी सुट्टीत कपात होणार असल्यामुळे अनेक शिक्षक संघटना व शिक्षकांनी याबाबत विरोध दर्शवला होता. त्यानंतर शिक्षण खात्याने विशेष वर्ग घेण्याची सूचना मागे घेत पुरवणी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊन परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती.
त्यानुसार नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 29 मे पासून नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाल्यानंतर अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे विशेष वर्ग घेतले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पुरवणी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.
दरम्यान, यंदाच्या दहावी परीक्षेमध्ये पहिल्यांदाच राज्यात 2 लाखाहून अधिक विद्यार्थी -विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच बेळगाव जिल्ह्यातही अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विशेष वर्ग घेतले जाणार आहेत.
दहावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक (अनुक्रमे तारीख व पेपर यानुसार) पुढील प्रमाणे आहे. 14 जून : मराठी, कन्नड, उर्दू, इंग्रजी (प्रथम भाषा). 15 जून : कन्नड, इंग्रजी (तृतीय भाषा). 18 जून : गणित. 20 जून : विज्ञान. 21 जून : इंग्रजी, कन्नड (द्वितीय भाषा). 22 जून : समाजविज्ञान.