बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराला आज दुपारपासून वळिवाच्या पावसाने झोडपून काढले आहे. सालाबादप्रमाणे बेळगाव शहरात शिवजयंती चित्ररथ महामंडळ आणि मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्यावतीने चित्ररथ मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून मान्सूनपूर्व पावसामुळे चित्ररथ मिरवणुकीवर सावट पसरले होते. तब्बल २ तासांहून अधिक काळ बरसलेल्या पावसाने विश्रांती घेतली असून आता चित्ररथ मिरवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
दुपारपासून सुरु झालेल्या पावसामुळे शिवजयंती उत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची धावपळ उडाली. एकीकडे चित्ररथावर सादर करणाऱ्या देखाव्यांची तयारी, देखाव्यातील पात्रांची होत असलेली वेशभूषा आणि रंगभूषा आणि दुसरीकडे पावसाने घातलेला गोंधळ यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र पावसाने विश्रांती घेत उघडीप दिल्याने चित्ररथ मिरवणूक सुरळीतपणे सुरु होणार आहे.
शतकोत्तर ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या बेळगावच्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीचे आकर्षण बेळगावसह गोवा आणि महाराष्ट्र राज्यातील शिवप्रेमींनाही असते.
चित्ररथ मिरवणूक पाहण्यासाठी बेळगाव शहर, तालुका यासह गोवा, आणि महाराष्ट्रातील विविध भागातील नागरिक विशेष बेळगावमध्ये दाखल होतात. बेळगावच्या रस्त्यारस्त्यावर शिवसृष्टी अवतरल्याचा भास या चित्ररथ मिरवणुकीमध्ये होतो.
भगवे ध्वज, झांज पथक, ढोल ताशा, लेझीम, वारकरी संप्रदाय, बैलगाड्या, घोडे आदींसह शिवकालीन देखाव्यात सहभागी असलेले कलाकार या सर्व वातावरणामुळे बेळगाव शिवमय होते. तब्बल १२ ते १४ तास चालणाऱ्या या मिरवणुकीत आबालवृद्धांच्या सहभाग आणि उत्साह उल्लेखनीय असतो.
देखावे सादरीकरणासाठी शिवजयंती उत्सव मंडळांची महिनाभर आधीपासूनच तयारी सुरु असते. यंदाच्या चित्ररथ मिरवणुकीचे हे १०५ वे वर्ष असून शतकोत्तर शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला अवघ्या काही क्षणातच सुरुवात होणार आहे.