Sunday, November 24, 2024

/

डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीची यशस्वी सांगता

 belgaum

बेळगाव लाईव्ह :दरवर्षीप्रमाणे शिवप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी बेळगावची भव्य, ऐतिहासिक शिवजयंती चित्ररथ मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अखंड जयजयकारात आज रविवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अपूर्व उत्साहात शांततेने पार पडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित त्यांच्या शौर्याची गाथा सांगणारे अनेक चित्ररथ मिरवणुकीत सहभागी होते.

जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे काल शनिवारी सायंकाळी शहरातील ऐतिहासिक शिवजयंती उत्सव मिरवणुकीला प्रारंभ होण्यास विलंब झाला. पावसाने विघ्न आणले तरी कार्यकर्ते आणि शिवप्रेमींचा उत्साह कायम होता. मिरवणुकीची सुरुवात पालखी पूजनाने झाली.

नरगुंदकर भावे चौक येथील मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळाच्या मंडपात पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बनिंग व महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, रणजीत चव्हाण -पाटील, विकास कलघटगी, मदन बामणे, माजी महापौर सरिता पाटील, महादेव पाटील, गणेश दड्डीकर, नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, सतीश गोरगोंडा, ॲड. धनराज गवळी आदींसह शहरातील मान्यवर मंडळी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पूजनानंतर जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषासह शिवरायांच्या जयजयकारात मारुती गल्ली रामदेव गल्ली समादेवी गल्ली यंदे खुट धर्मवीर संभाजी महाराज चौक त्या मार्गावर पालखी मिरवणूक काढण्यात आली.

पालखी मिरवणूक पार पडल्यानंतर शिवजयंती उत्सव चित्ररथ मिरवणुकीला प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास या चित्ररथांमधून अक्षरशः जिवंत करण्यात आला होता. चित्ररथ पाहण्यासाठी अबालवृद्ध शिवभक्तांनी मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा तसेच प्रमुख चौकांमध्ये एकच गर्दी केली होती. झांज पथकाचा निनाद, पोवाड्यांच्या आवाज, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, भगवे ध्वज, भगवे फेटे अशा जल्लोषी वातावरणामुळे सर्वत्र सळसळता उत्साह दिसून येत होता. विशेष करून ढोल-ताशा पथकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

शहरातील पाटील गल्ली येथील भगतसिंग चौक मंडळाने अफजल खान वध, ताशिलदार गल्लीतील मंडळांने प्रतापराव गुर्जर यांचा पराक्रम, सह्याद्रीपुत्र युवक मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेला विष प्रयोग, एकदंत युवक मंडळ समर्थनगर यांनी कोंडाजी फर्जद, अनंतशयन गल्ली येथील भगवे वादळ युवक मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव या पद्धतीने विविध मंडळांनी चित्तवेधक देखावे सादर केले होते.Shivjayanti 2024

एकंदर अधून मधून पावसाची हजेरी असली तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग, सजीव देखावे, समाज प्रबोधनात्मक देखावे, मर्दानी खेळ, ढोल ताशांचा गजर, भगवे ध्वज, शिवरायांचा जयजयकार अशा शिवमय वातावरणात मिरवणुकीतील उत्साह आज रविवारी सकाळपर्यंत ओसंडून वाहत होता. दरवर्षीप्रमाणे यावेळी देखील शिवभक्तांना चित्ररथ मिरवणूक पाहणे सोयीचे जावे यासाठी प्रशासनाकडून धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली होती.

यंदाच्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्यांचा वापर अधिक प्रमाणात झाल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे अनेक सामाजिक संघटना व समाजसेवकांनी मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी पुलावा, पिण्याचे पाणी, ताक व चहा वाटपाचा उपक्रम राबविल्यामुळे शिवभक्तांची चांगली सोय झाली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुन्हा जागविणाऱ्या या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीची आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास शांततेत यशस्वी सांगता झाली. चित्ररथ मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.