बेळगाव लाईव्ह : शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास सुरु झालेल्या वळिवाच्या पावसाने नागरिकांची दैना उडवली. सकाळपासून ढगाळ वातावरण जाणवत होते. त्यानंतर दुपारी पावसाने सुरुवात केल्यानंतर शहरातील अनेक गल्ल्या पाण्याने भरलेल्या दिसून आल्या.
गटारी तुडुंब भरून बेळगाव शहरातील विविध गल्ल्यांमधील दुकानांमध्ये पाणी शिरल्याचेही दिसून आले. विजांच्या गडगडाटासह जोरदार बरसलेल्या वळिवाने नागरिकांची त्रेधातिरपीट तर उडवलीच मात्र रस्त्यावरील विक्रेत्यांचेही मोठे हाल झाले. पांगुळ गल्ली, भोई गल्ली, भेंडी बाजारातील दुकानांमध्ये गटारी भरून ओव्हरफ्लो झालेले पाणी शिरल्याने व्यापारी वर्गाची तारांबळ उडाली. याच परिसरात झाड कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.
गणपत गल्ली परिसरातील गटारी तुडुंब भरल्याने रस्त्यावर पाणी ओसंडून वाहात होते. गटारीचे पाणी गणपत गल्ली परिसरातून मारुती गल्लीच्या दिशेने वाहून आल्याने नरगुंदकर भावे चौक आणि मारुती गल्लीच्या चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना गटारीच्या पाण्यातून मार्ग काढण्याची वेळ आली. दुचाकीस्वारांनी पावसामुळे आसरा घेण्यासाठी दुकानाच्या शेडमध्ये गर्दी केल्याने रस्त्यावरील वाहतूक कमी होती. मात्र रिक्षा आणि चारचाकी वाहनांची काहीशी वर्दळ दिसून आली.
सायंकाळी सुरु होणाऱ्या चित्ररथ मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक शिवजयंती उत्सव मंडळांनी चित्ररथ मिरवणूक मार्गात दाखल केले होते. देखावे सादर करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या चित्ररथाचे पावसापासून संरक्षण करण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांचीही धावपळ उडाली.
सायंकाळी वेळेत चित्ररथ सुरु करण्यासाठी शिवजयंती उत्सव मंडळांनी सर्व तयारी केली होती. परंतु अचानक कोसळलेल्या पावसामुळे शिवजयंती उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.