बेळगाव लाईव्ह : गेल्या आठवडाभरात बेळगावसह आसपास परिसरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून शनिवारी सकाळपासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे.
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होणार असून शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण अनुभवायला मिळाले.
ठिकठिकाणी पावसाचा शिडकावा झाला असून मशागतीच्या कामांनाही वेग आला आहे. शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण असूनही उष्णतेपासून दिलासा मिळाला नाही. परंतु तापमानात घट झाल्याचे जाणवत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा पाऊस अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे यंदा मृग नक्षत्रात खरीप हंगाम पेरणी होण्याची शक्यता आहे.
त्यानुसार शेतकऱ्यांनी मशागत कामाला गती दिली आहे. खरीप हंगामाच्या पेरणीसाठी खत, बी-बियाणे यासह शेतीकामासाठी लागणाऱ्या साहित्याची तजवीज करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे.