बेळगाव लाईव्ह :सांबरा येथे श्री महालक्ष्मी यात्रोत्सवानिमित्त येत्या मंगळवार दि. 21 मे 2024 रोजी आयोजित आंतरराष्ट्रीय जंगी कुस्ती मैदान पावसाच्या अवकृपेमुळे रद्द करून पुढे ढकलण्यात आले असल्याची माहिती सांबरा कुस्ती कमिटीचे पदाधिकारी यल्लाप्पा हरजी यांनी दिली.
सांबरा (ता. जि. बेळगाव) येथे कुस्ती मैदानाच्या आखाड्याच्या ठिकाणी आज सकाळी ते बेळगाव लाईव्हशी बोलत होते. यल्लाप्पा हरजी सांगितले की, गेल्या तीन महिन्यापासून सांबरा कुस्ती कमिटी आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून सदर आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाची मोठ्या प्रमाणात तयारी करत आहे.
त्या अनुषंगाने गावच्या बसवांना तलाव येथे श्री महालक्ष्मी मैदानात आखाडा तयार केला जात आहे. मैदानाची डागडुजी करून आसन व्यवस्था केली जात होती. नुकतीच आखाड्याची उभारणी देखील जवळपास पूर्णत्वास आली होती.
मात्र गेल्या कांही दिवसापासून सातत्याने होणाऱ्या पावसामुळे कुस्ती कमिटीला इच्छा नसतानाही कुस्ती कमिटीला नाईलाजाने हे कुस्ती मैदान पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे लवकरच या भव्य जंगी कुस्ती मैदानाची नवी तारीख आम्ही घोषित करणार आहोत.
गावच्या श्री महालक्ष्मी यात्रेनंतर हे मैदान पुन्हा भरवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यानुसार यात्रेनंतर कुस्ती मैदानाची नवी तारीख घोषित केली जाईल अशी माहिती देऊन याची नोंद सर्व कुस्ती शौकीन आणि पैलवान बंधूंनी घ्यावी, असे आवाहन यल्लाप्पा हरजी यांनी केले.
याप्रसंगी कुस्ती कमिटीचे अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. कुस्ती मैदानाचे आयोजन केले जाणाऱ्या सांबरा गावच्या बसवांना तलावाच्या ठिकाणी पावसामुळे सध्या पाणी साचण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात चिखलाची दलदल निर्माण झाली आहे.