बेळगाव लाईव्ह : १४ मे ते २२ मे अशा ९ दिवसात बेळगाव तालुक्याच्या पूर्व भागातील सांबरा या गावात भव्य अशी श्री महालक्ष्मी यात्रा साजरी करण्यात आली. १८ वर्षानंतर भरविण्यात आलेल्या या यात्रेत संपूर्ण ९ दिवस उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला.
हजारोंच्या संख्येने भाविकांनी या यात्रेसाठी उपस्थिती दर्शविली. मात्र यादरम्यान गावात निर्माण झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची? कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करायचे? याबाबतीत सांबरा ग्रामपंचायत, माजी जिल्हा पंचायत सदस्य नागेश देसाई आणि ग्रामस्थांच्या पुढाकारातून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
गेल्या ९ दिवसांपासून सुरु असलेल्या श्री महालक्ष्मी यात्रेची सांगताही पार पडली. यात्राकाळात हजारो भाविकांनी सांबरा गावात उपस्थिती दर्शविली. यादरम्यान गावच्या चारी बाजूंनी मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाला. मात्र यात्रेची सांगता झाल्यानंतर तातडीने या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वच्छता कर्मचारी, समाजसेवक, स्वयंसेवक, ग्रामस्थ, ग्रामपंचायत अशा सर्वांच्या सहकार्यातून कचरा गोळा करण्यात आला.
हा कचरा पुढे कचरा व्यवस्थापनासाठी पाठविण्यात आला. इतकेच नाही तर संपूर्ण गावात निर्जंतुकीकरणासाठी आवश्यक ती उपाययोजनाही आखण्यात आली.
येत्या आठवड्याभरात मान्सूनचे आगमन होईल. त्यापाठोपाठ साथीच्या रोगांचेही आगमन होईल. मात्र यासाठीदेखील सांबरा गावाने उपाययोजना आखत आरोग्यविभागाच्या माध्यमातून आणि आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गावातील प्रत्येक घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी मोहीम राबविली. आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले.
तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या सहकार्यातून संपूर्ण ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली. गावातील प्रत्येक घराघरात पूर्वखबरदारीसाठी औषधांचे वितरण करण्यात आले. यात्राकाळात अन्न आणि पाण्यात झालेल्या फरकामुळे उलटी, जुलाब यासह इतर आजार होण्याची शक्यता असल्याने घरोघरी आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विचारपूरस करून औषधांचे वितरण करण्यात आले.
सहसा यात्रा आटोपल्यानंतर अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होते. यात्राकाळात करण्यात आलेला मांसाहार, खाद्यपदार्थ, पेयजल अशा माध्यमातून प्लास्टिकसह ओला कचराही मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. यात्रेचा कालावधी, गावाची हद्द आणि यात्राकाळात होणारी नागरिकांची गर्दी पाहता या सर्व गोष्टींचे वेळेत नियोजन होणे क्लिष्टदायक असते. परंतु सांबरा येथील यात्रेनंतर तातडीने घेतलेला निर्णय हा अनुकरणीय आणि आदर्शवत आहे.
मूलतः या भागात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. पावसाळी हंगाम सुरु झाला कि शेतीकामांना वेग येतो. यात्रा पार पडल्यानंतर लगेचच शेतीकामात सर्वजण गुंतणार आहेत. याच पार्श्वभूमीवर भविष्यात आरोग्याच्या तक्रारी उद्भवू नयेत यासाठी सांबरा या गावाने उचललेले आदर्शवत पाऊल हे कौतुकास पात्र ठरेल, असेच आहे.