बेळगाव लाईव्ह :जोरदार वळीव पावसाने आज गुरुवारी सांबरा गावाला झोडपून काढले. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे रस्त्यावरील झाडासह गावातील एक विद्युत ट्रान्सफॉर्मर खांबासकट उन्मळून पडला.
सांबरा (ता. जि. बेळगाव) गावासह परिसरात आज दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली. सध्या सांबरा गावात श्री महालक्ष्मी देवीची यात्रा सुरू असल्यामुळे भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
तथापि आज पावसाने जोरदार दणका देताच भाविकांनी फुलून गेलेले गावातील रस्ते क्षणार्धात निर्मनुष्य झाले. जो तो पावसापासून बचाव करण्यासाठी आसरा शोधताना दिसत होता.
वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे ठीकठिकाणी झाडांच्या फांद्या तुटूनपडण्याबरोबरच एका ठिकाणी संपूर्ण झाड उन्मळून रस्त्यावर कोसळले. त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता.
याखेरीज गावात एका ठिकाणी विद्युत ट्रान्सफॉर्मर खांबासकट खाली कोसळला. सुदैवाने त्यामुळे कोणाला इजा झाली नसली तरी दुचाकी वाहनांचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला.