बेळगाव लाईव्ह :राज्यातील सुमारे साडेआठ लाख विद्यार्थी -विद्यार्थिनींचे लक्ष लागून राहिलेल्या एसएसएलसी परीक्षेचा निकाल येत्या बुधवार दि. ८ मे रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.
यंदाच्या एसएसएलसी परीक्षेच्या पत्रिकांचे मूल्यमापन कार्य पूर्ण होत आले असून विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची गणकीकरण प्रक्रिया सुरू झाली असून ती पूर्ण व्हायला चार दिवस लागतील. सदर सर्व प्रक्रिया पूर्ण करून येत्या बुधवारी 8 मे रोजी निकाल जाहीर करण्याचा कर्नाटक शालांत परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचा मानस आहे.
जर एखाद्या वेळेस गणकीकरण कार्याला विलंब झाल्यास अथवा ते वेळेत पूर्ण झाले नाही तर निकाल जाहीर होण्यास एक -दोन दिवस उशीर होऊ शकतो असे सूत्रांकडून कळते.
यंदाची एसएसएलसी परीक्षा गेल्या मार्च 25 पासून एप्रिल 6 तारखेपर्यंत राज्यातील विविध 2,650 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. सदर परीक्षेत राज्यातील 8.69 लाख विद्यार्थी -विद्यार्थिनींनी उपस्थित दर्शवली होती.