बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयात अद्यापही 37 दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मान्सून सुरू होईपर्यंत पाण्याचा जपून वापर करावा, अशी माहिती वजा सूचना महापालिका आयुक्त पी. एन. लोकेश यांनी दिली आहे.
राकसकोप जलाशयातील पाणीसाठा काल मंगळवारी 2,255.65 फुटावर येऊन पोहोचला आहे. हा पाणीसाठा 37 दिवस पुरणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त लोकेश दिली.
यापूर्वी राकसकोप जलाशयातील पाणी 25 मेपर्यंत पुरणार असल्याची माहिती महापौर सरिता कांबळे यांनी पाहणी दरम्यान दिली होती. त्यानंतर एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी राकसकोप जलाशयाची पाहणी केली होती. त्यावेळी एल अँड टी कंपनीचे व्यवस्थापक धीरज उभयकर यांनी जून अखेरपर्यंत शहरवासीयांना पाणी पुरवू, अशी माहिती दिली होती.
आता काल मंगळवारी आयुक्त लोकेश यानी राकसकोप जलाशयाचा पाणीसाठा 37 दिवस पुरेल इतका असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या कालावधीत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच येत्या 15 जून नंतर जलाशयाच्या मृत साठ्यातून (डेड स्टोरेज) पाणी उपसा करावा लागणार आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात नऊ दिवसात पाणीपुरवठा सुरू झाल्यामुळे पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी शहरवासीयांना भटकंती करावी लागत आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू करण्यात आलेली शुद्ध पाणीपुरवठा करणारी केंद्रे (आरओ प्लांट) देखील बंद झाली आहेत.
काविळीची साथ पसरल्यामुळे शुद्ध पाणी विकत घेऊन तहान भागवण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. हॉटेल व्यवसायिकांना तर टँकरने पाणी विकत घेतल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. तेंव्हा पावसाने लवकर हजेरी लावली नाही तर पाणी पुरवठा दहा दिवसाआड होण्याची शक्यता आहे.