बेळगाव लाईव्ह:बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाची पाणी पातळी गेल्या पाच दिवसात आणखी घटली असून ती काल बुधवारी 2454 फूट इतकी झाली होती. तथापि गतवर्षीच्या तुलनेत यंदा जलाशयातील पाण्याची पातळी अडीच फूट जास्त आहे.
राकसकोप जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला असला तरी जलाशयातील पाणी पातळी वाढलेली नाही. पाण्याची नियमित आवक (इन-फ्लो) होत नाही तोपर्यंत पाणी पातळी वाढणार नसल्याचे पाणी पुरवठा मंडळाचे म्हणणे आहे.
गेल्या वर्षी 29 मे रोजी जलाशयातील पाण्याची पातळी 2451.45 फूट इतकी होती, तर यंदा ती 2454 फूट इतकी आहे. त्यामुळे येत्या 15 जूनपर्यंत जलाशयातील जिवंत पाणीसाठा बेळगावसाठी उपलब्ध असणार आहे.
बेळगाव शहराच्या पाणी पुरवठ्याचे स्त्रोत असलेल्या हिडकल जलाशयातही यंदा पुरेसा पाणीसाठा आहे. गतवर्षी 29 मे रोजी हिडकल जलाशयात 6.635 टीएमसी इतका एकूण पाणीसाठा होता तर 4.615 टीएमसी इतका जिवंत पाणी साठा होता.
यंदा हिडकल जलाशयामध्ये 11.76 टीएमसी इतका एकूण पाणीसाठा तर 9.742 टीएमसी इतका जिवंत पाणी साठा आहे. हिडकलमधील 1.45 टीएमसी पाणी बेळगाव शहरासाठी राखीव ठेवले जाते. त्यामुळे राकसकोप मधील पाणीसाठा संपला तरी हिडकल मधून शहराला पाणी पुरवठा होऊ शकतो.