बेळगाव लाईव्ह विशेष : सध्या दररोज जोरदार हजेरी लावणाऱ्या वळीव पावसामुळे शहरातील अवैज्ञानिक रस्ते, गटार व ड्रेनेज व्यवस्थेचा फटका शहरवासीयांना तीव्रतेने बसू लागला आहे. साध्या वळीव पावसामुळे नाले, गटारी व ड्रेनेजचे सांडपाणी रस्त्यावर येणे, तुंबणे, घराघरात शिरणे असे प्रकार घडत असल्याने याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल करण्याबरोबरच त्रस्त जनतेकडून प्रशासनाला शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्या जात आहेत. तसेच प्रशासन युद्धपातळीवर योग्य त्या उपाययोजना करणार की बेळगावची अशी ‘तुंबापुरी’ कायमच होत राहणार? असाही सवाल केला जात आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून मान्सूनपूर्व वळीव पावसाने बेळगाव शहर परिसराला झोडपण्याचा क्रम सुरू ठेवला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसामुळे शहरातील पांगुळ गल्ली, भेंडी बाजार, फोर्ट रोड, फ्रुट मार्केट, गोवावेस, शहापूर भाजी मार्केट, वगैरे बहुतांश परिसरातील गटारी व ड्रेनेज तुंबून सांडपाणी केरकचरा रस्त्यावर येत आहे.
यामुळे सध्या स्मार्ट बेळगावला बहुतांश ठिकाणी बकाल स्वरूप प्राप्त झाल्याचे पहावयास मिळत आहे. याला चुकीच्या पद्धतीने अवैज्ञानिकरित्या केला जाणारा शहराचा विकास कारणीभूत असल्याचे जाणकारांचे मत आहे.
मान्सून पूर्व गटारी नाले साफसफाईचा अभाव तसेच चुकीची गटार जोडणी. यामुळे पावसाने जोरदार हजेरी लावताच अवघ्या कांही मिनिटात शहरातील गटारी, ड्रेनेज तुंबत आहेत. कांही ठिकाणी गटारींची उंची वाढवल्याने मुख्य रस्त्यासह सकल भागात पाणी साचून अनेक ठिकाणी तळी निर्माण होत आहेत.
या खेरीज स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बहुतांश रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात आले आहे. यापैकी बऱ्याच रस्त्यांवर पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची सोय करण्यात आलेली नाही. परिणामी बऱ्याच ठिकाणी गटारी व रस्त्यांची अवस्था बंदिस्त तोंड बांधल्याप्रमाणे झाली आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन घरांमध्ये पाणी शिरत आहे.
स्मार्ट सिटी लिमिटेड आणि प्रशासनाच्या विकास कामांमधील नियोजनाच्या अभावामुळे सदर प्रकार घडत असल्याचा आरोप होत आहे. बेळगावच्या वातावरणाचा विचार न करता गटारी, रस्ते आणि ड्रेनेजची विकास कामे करण्यात आली आहेत. बेळगावचा प्रदेश हा तुफान मुसळधार पाऊस पडणारा प्रदेश आहे. मात्र याचाही विचार न केल्यामुळे सध्याची परिस्थिती उदभवत असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.
एकंदर सध्या जोरदार हजेरी लावणाऱ्या वळीव पावसाने बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेड आणि महापालिकेची पोलखोल केल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे साध्या पावसामुळे शहराची या पद्धतीने दैना उडत असेल तर पावसाळ्यात याहीपेक्षा भयंकर परिस्थितीला शहरवासीयांना तोंड द्यावे लागणार आहे.
प्रशासनाने तात्काळ योग्य त्या उपाययोजना न केल्यास पावसाळ्यात बेळगावची ‘तुंबापुरी’ होऊन शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात येणार हे निश्चित आहे.