बेळगाव लाईव्ह :गजपती गावातील तलावाच्या पुनरुज्जीवन कामाच्या स्वरूपातील प्यास फाऊंडेशनच्या यंदाच्या तिसऱ्या प्रकल्पाचा शुभारंभ नुकताच भूमिपूजनाने करण्यात आला.
गजपती हे गाव बेळगाव तालुक्यात बेळगाव शहरापासून 28 कि. मी. अंतरावर आहे. गावाची लोकसंख्या सुमारे 2600 असून गावात सुमारे 500 गुरे आहेत. येथे सध्या अस्तित्वात असलेल्या तलावाच्या खोलीत पाणी टिकत नाही आणि उन्हाळ्यात तलाव कोरडा पडतो.
त्यामुळे प्यास फाउंडेशनतर्फे तलावाची खोली 6 फूट वाढवून 6.4 एकरात असलेल्या या तलावाचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. तलावाच्या सभोवतालच्या पट्ट्याही मजबूत केल्या जाणार आहेत.
येत्या जूनच्या पहिल्या आठवड्यात हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या तलावमध्ये संपूर्ण पावसाचे पाणी साठवून भूगर्भातील पाणी वाढवणे आणि आजूबाजूच्या विहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
तलाव पुनरुज्जीवन कामासाठी किरण जिनागौडा आणि बालचंद्र बदन हे जिनाबाकुल फोर्जच्या माध्यमातून मदत करणार असून या प्रकल्पात सीएसआर भागीदार आहेत. सदर तलावाच्या पुनरुज्जीवन कामाचा नुकताच भूमिपूजनाने शुभारंभ करण्यात आला
. याप्रसंगी प्यास फाउंडेशनच्या सचिव डॉ. प्रीती कोरे, अवधूत सामंत, सतीश लाड, रोहन, लक्ष्मीकांत, अभिमन्यू दागा आदींसह गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.