Tuesday, January 7, 2025

/

‘पब्लिक बाईक शेअरिंग’ रखडली?

 belgaum

बेळगाव लाईव्ह : जनतेला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने स्मार्ट सिटीने कोट्यवधी रुपये खर्चून सुरू केलेली ‘पब्लिक बाइक शेअरिंग योजना’ रखडल्याचे चित्र दिसत आहे. पब्लिक बाइक शेअरिंग योजना आता पूर्णपणे फोल ठरली असून योग्यरितीने हाताळण्यात न आलेली योजना, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे जीर्ण झालेल्या सायकली आणि नागरिकांनी याकडे फिरविलेली पाठ यामुळे सदर योजना अयशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे.

स्मार्ट सिटी लिमिटेडच्या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (PPP) अंतर्गत याना बाईक्स च्या माध्यमातून हि योजना राबविण्यात आली होती. धर्मवीर संभाजी चौक, आरपीडी कॉलेज रोड,टिळकवाडी पहिले रेल्वेगेट, वॅक्सीन डेपो, उद्यमबाग, जिजामाता चौक, सीबीटी, विशाल मेगा मार्ट जवळ कणबर्गी रोड, श्री नगर गार्डन, राणी चन्नम्मा सर्कल,

कृष्णदेवराय सर्कल, एपीएमसी रोड, जाधव नगर, हनुमान नगर सर्कल आणि हिंडलगा गणपती आदी ठिकाणी पब्लिक बाईक शेअरिंग केंद्र सुरु करण्यात आले होते. यासाठी मनपाने सायकल ट्रॅकचीही निर्मिती केली होती. मात्र अपूर्ण जनजागृती आणि या सेवेबद्दल नागरिकांना पूर्णपणे देण्यात न आलेली माहिती यामुळे पब्लिक बाईक शेअरिंग सह सायकल ट्रॅक देखील धूळ खात पडले आहेत.

अनेक ठिकाणी फुटपाथवरील विक्रेत्यांनी अतिक्रमण करून सायकल ट्रॅक वर कब्जा केला आहे. तर काही ठिकाणी सायकल ट्रॅकवर पार्किंग करण्यात येत आहे. सध्या शहरात सायकलसाठी बांधण्यात आलेल्या डॉकिंग स्टेशनची दुरवस्था झाली आहे.

संबंधितांनी लक्ष न दिल्याने सायकलला गंज चढून सामानाचेही नुकसान झाल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी धूळ खात पडलेल्या सायकली मनपा कर्मचाऱ्यांनी उचलून नेल्याची माहितीही उपलब्ध झाली आहे. स्मार्ट सिटीच्या पब्लिक बाईक शेअरिंग योजनेला निष्काळजीपणाचा फटका बसला असून अनेक सायकली अल्पावधीतच भंगारात गेल्याचीही माहिती समोर येत आहे.

अनेक डॉकिंग स्टेशनवर निम्म्याहून कमी सायकली उभ्या राहिल्या असून समोर आलेल्या तपासणीदरम्यान, काही स्थानकांच्या स्टँडमध्ये तुटलेल्या सायकली आढळून आल्या आहेत तर काही ठिकाणी असे स्टँड देखील आढळून आले आहेत जिथे भिक्षुकांनी तळ ठोकला आहे.

शहरातील पर्यावरणाचे प्रदूषणापासून रक्षण आणि लोकांचे आरोग्य राखण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही स्मार्ट योजना फसली असून या योजनेतही जनतेचा पैसा वाया गेल्याचे दिसून येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.