बेळगाव लाईव्ह : राज्यातील दुसऱ्या टप्प्यात पार पडलेल्या १४ मतदार संघांपैकी आज बेळगाव जिल्ह्यातदेखील मतदान प्रक्रिया पार पडली असून मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर शहरातील गजबजलेल्या रस्त्यांवर शुकशुकाट पसरलेला दिसून आला.
बेळगावच्या तापमानात गेल्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून शहराचा पारा ४० अंश सेल्सियसवर जाऊन पोहोचला आहे. रणरणत्या उन्हात देखील आज बेळगावकरांनी मतदानाला उस्त्फुर्त प्रतिसाद दिला.
मात्र दुसरीकडे मंगळवारी बंद असणारे अनेक व्यवसाय, साप्ताहिक सुट्टी, उन्हाचा तडाखा आणि मतदानासाठी देण्यात आलेली शासकीय कर्मचाऱ्यांना पगारी रजा या सर्व पार्श्वभूमीवर शहर परिसरातील रस्ते आणि बाजारपेठ निर्मनुष्य दिसून आली. शिवाय पोलीस कर्मचारीही निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने शहरातील अनेक ठिकाणची सिग्नल यंत्रणाही काही काळ कोलमडलेली दिसून आली.
मारुती गल्ली, गणपत गल्ली, खडेबाजार, कडोलकर गल्ली, पांगुळ गल्ली, यंदेखूट सह गजबजलेल्या रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. रस्त्यांवरील गर्दी कमी झाल्यामुळे प्रमुख रस्ते ओस पडले होते. बहुतांशी नागरिकांनी मतदान केल्यानंतर घरीच राहणे पसंत केले. केवळ शहर परिसरातच नाही तर ग्रामीण भागातही असेच चित्र पाहायला मिळाले.
सायंकाळपर्यंत मतदान केंद्राच्या आसपास विविध पक्षांचे कार्यकर्ते, समर्थक आणि स्वयंसेवकांची गर्दी वगळता इतरत्र शांतता जाणवली. विविध आस्थापने, कार्यालये, दुकान व्यावसायिकांनी कर्मचाऱ्यांना सुट्टी दिल्याने शहरातील बहुतांशी ठिकाणची दुकाने बंद स्थितीत दिसून आली. मतदानाचा हक्क बजावून आज निवडणुकीच्या सुट्टीचा घरीच राहून आनंद घेणे नागरिकांनी पसंत केले.