बेळगाव लाईव्ह : कन्नड सक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना एक जून रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने अभिवादन करण्यात येते त्याकरिता हुतात्मा स्मारकाची साफसफाई करण्यात आली.
दरम्यान गुरुवारी (दि. 30) हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाची स्वच्छता करण्यात आली. यावेळी अनिल हेगडे, उदय नाईक, नागेश किल्लेकर, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र कुद्रेमनीकर, निंगाप्पा मोरे आदी उपस्थित होते.
सीमाभागात कन्नडसक्तीविरोधात 1986 मध्ये झालेल्या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्यांंना शनिवारी (दि. 1) सकाळी 8.30 वाजता हुतात्मा स्मारकात अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी सर्व मराठी भाषिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका आणि शहर महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.
कर्नाटक सरकारने सीमाभागातील मराठी भाषिकांवर 1986 मध्ये कन्नडसक्ती लागू केली. याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मराठी जनतेत असंतोष उफाळला. त्यावेळी झालेल्या आंदोलनात पोलिसांनी मराठी भाषिकांवर बेछूट गोळीबार केला. त्यात सीमाभागातून 9 जणांनी हौतात्म्य पत्करले. या आंदोलनात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, छगन भुजबळ यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक नेते सहभागी झाले होते. या आंदोलनातील हुतात्म्यांना दरवर्षी हिंडलग्यातील हुतात्मा स्मारकात अभिवादन करण्यात येते.
शनिवारी (दि. 1) सकाळी 8.30 वाजता हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका समिती कार्याध्यक्ष, माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस अॅड. एम. जी. पाटील, शहर समिती अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे आजी माजी नगरसेवक लोकप्रतिनिधींनी केले आहे.