बेळगाव लाईव्ह : गोकाक तालुक्यातील घटप्रभा नदीवर असणारा धबधबा ऐन मे महिन्यात प्रवाहित झाला आहे. गेल्या चार दिवसात वळिवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने हा धबधबा पूर्णपणे प्रवाहित झाल्याने उन्हाळी पर्यटनासाठी पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. गोकाक धबधब्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे धबधबा ओसंडून वाहत आहे.
बेळगाव शहरापासून ६० किलोमीटर अंतरावर असणारा गोकाचा धबधबा ऐन उन्हाळ्यात अशापद्धतीने प्रवाहित झाल्याने पर्यटकातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ऐन उन्हाळ्यात धबधबा प्रवाहित झाल्याने निसर्ग सौंदर्यदेखील खुलले आहे.
पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारा बेळगाव जिल्ह्यातील गोकाक धबधबा वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. परंतु धबधबा परिसरात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे उन्हाळ्यातच हा धबधबा प्रवाहित झाला आहे. निसर्गाचं विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी पर्यटक देखील गर्दी करू लागले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून विविध भागांत सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे घटप्रभा नदी प्रवाहित झाली असून गोकाक धबधब्यालाही पाणी आले आहे. कोकण भागात पावसाचा जोर वाढल्याने बेळगावातील घटप्रभा नदीच्या प्रवाहात वाढ झाली असून या नदीवर असणारा गोकाकचा धबधबा प्रवाहित झाला आहे. धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला नसला तरी उन्हाळी पर्यटनासाठी पर्यटकांनी हजेरी लावली आहे.
गोकाक तालुक्यातील धबधबा अलीकडे कमालीचे लोकप्रिय झालेले ठिकाण आहे. तरुणाईबरोबरच आबालवृद्धांना या धबधब्यासह येथील वातावरणाची भुरळ पडली आहे. पावसाळ्यात येथील वातावरण अत्यंत मनमोहक असते.
हा नयनरम्य परिसर व नजारे डोळ्याने पाहून मनात साठवण्यासाठी व कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी धडपड सुरू असते मात्र पावसाळा सुरु होण्यापूर्वीच पर्यटकांना गोकाक धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्याची संधी मिळाल्याने पर्यटकातून आनंद व्यक्त होत आहे.