Thursday, January 23, 2025

/

यात्रेच्या निमित्ताने उचगाव येथे मद्यपी वाढता उपद्रव

 belgaum

बेळगाव लाईव्ह :उचगाव (ता. जि. बेळगाव) येथील श्री मळेकरणी देवी यात्रेला मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांपैकी काही मद्यपी भाविक मंडळींचा उपद्रव विशेष करून मंगळवारी व शुक्रवारी वाढला आहे. तेंव्हा ग्रामपंचायतीसह पोलीस खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कडक उपाययोजना करण्याद्वारे मद्यपींचा योग्य बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी जागरूक गावकऱ्यांकडून केली जात आहे.

उचगाव येथील जागृत देवस्थान श्री मळेकरणी देवीची दर मंगळवारी व शुक्रवारी यात्रा भरत असते. यात्रेनिमित्त देवीला बकऱ्याचा मान देऊन भाविक मासाहाराच्या प्रसादाचे वाटप करत असतात. भक्तिभावाने ही धार्मिक परंपरा जपली जात असली तरी अलीकडे प्रसाद स्वरूप मासाहारापूर्वी दारू ढोसणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे.

हे मद्यपी  पूर्वी एका बाजूला दूर एकांतात गुपचूप मद्य प्राशन करून पंगतीला बसत होते. मात्र अलीकडे ही मंडळी श्री मळेकरणी देवस्थान परिसरामध्ये खुलेआम मद्य प्राशन करू लागली आहेत.

देवीच्या प्रसादाच्या जेवणाला रंगीतपार्टीचे स्वरूप देण्याचा नवा निषेधार्ह पायंडा पाडणाऱ्या या काही मुळे उचगाव गावकऱ्यांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. कारण मंदिराच्या आवाराबाहेर ठीकठिकाणी तसेच शेतामध्ये दारू ढोसणारी ही मंडळी जाताना दारूच्या बाटल्या, बियर बाटल्या, दारूचे टेट्रा पॅक आणि खाद्यपदार्थ, त्यांच्या पिशव्या, कागद वगैरेंचा कचरा करून जात आहेत.Uchgaon

परिणामी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी श्री मळेकरणी मंदिर परिसरात प्रचंड केरकचरा जमा झालेला असतो. कहर म्हणजे काही भाविक चक्क गावातील कोणाच्याही घरासमोर आपल्या गाड्या लावून दारू ढोसत असतात. श्री मळेकरणी देवी मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या शेतवाडीमध्ये तर दर मंगळवार व शुक्रवारी दारुड्या भाविकांची टोळकी दिवसभर ठाण मांडून बसलेली असतात.

त्यांनी शेतात, बांधावर खाद्यपदार्थ, प्लास्टिक पिशव्यांचा आणि दारूच्या बाटल्यांचा केलेला कचरा दुसऱ्या दिवशी बिचाऱ्या शेतकऱ्याला साफ करावा लागतो. त्याचप्रमाणे दारुड्यांची टोळकी दिवसभर शेतात वावरत असल्यामुळे त्या शेतामध्ये काम करणाऱ्या महिला कामगार दर मंगळवारी व शुक्रवारी शेताकडे फिरकेनाशा झाल्या आहेत.

याखेरीज उचगावमध्ये श्री मळेकरनी हायस्कूल आणि स्वामी विवेकानंद हायस्कूल अशा दोन माध्यमिक शाळा आहेत. उचगाव येथून श्री मळेकरणी मंदिराला लागून कोणेवाडी गावाच्या दिशेने एक रस्ता गेला आहे. या रस्त्यावर कोनेवाडी च्या अलीकडे जावईवाडी म्हणून एका गल्लीची एक छोटी वस्ती आहे. तेथील विद्यार्थी -विद्यार्थिनी उचगाव येथील हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी येत असतात.Samarth

यापैकी शाळा सुटल्यानंतर घरी जाणाऱ्या विद्यार्थिनींची मळेकरणी यात्रेसाठी आलेल्या मद्यपींकडून छेड काढण्याचे प्रकार घडत होते. सदर प्रकारांना कंटाळून संबंधित विद्यार्थिनींचे पालक आता आपल्या मुलींची शाळाच बदलून त्यांना चिरमुरी येथील शाळेला पाठवत असल्याचे समजते. तेंव्हा या सर्व प्रकारांची गांभीर्याने दखल घेऊन पोलीस खात्यासह उचगाव ग्रामपंचायतने कडक उपाययोजना करून मद्यपी भाविकांचा योग्य बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी गावातील जागरूक नागरिकांकडून केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.