बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्रातील कोयना जलाशयातून कर्नाटकातील कृष्णा नदीत पाणी सोडण्यासाठी कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार केला होता.
पत्रात केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्र सरकारने कर्नाटकातील कृष्णा नदीला पाणी सोडण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती कर्नाटकाचे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री सतीश जारकीहोळी यांनी आज दिली.
आज रायबाग तालुक्यातील कुडची येथील कृष्णा नदी परिसराला भेट दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. गेल्या आठवड्याभरात महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पाऊस झाला आहे. यानुसार कोयना जलाशयाच्या पाणी पातळीत भर पडली असून कोयना नदीतून कृष्णा नदीला पाणी सोडण्याची विनंती कर्नाटक सरकारने केली होती.
या मागणीनुसार महाराष्ट्र सरकारने कृष्णा नदीला पाणी सोडण्याची तयारी दर्शविली असून लवकरच कृष्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त केले आहेत, अशी माहिती दिली.
आज नदीतील पाणी पातळीची पाहणी करताना मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या समवेत स्थानिक नेते आणि विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.