बेळगाव लाईव्ह : शेतपिकासाठी कर्जस्वरूपात घेतलेल्या रकमेची परतफेड करता न आल्याने सावकार सिद्धव्वा बयण्णवर यांनी कर्जदार शेतकऱ्याच्या मुलाला आणि पत्नीला नजरकैदेत ठेवल्याने हताश झालेल्या शेतकऱ्याने आत्महत्येचे पाऊल उचलले.
याप्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसांनी दिरंगाई दाखवली, त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती बेळगावचे प्रभारी पोलीस अधीक्षक बी.एस.न्यामागौडा यांनी दिली.
बेळगावचे पोलीस अधीक्षक गुळेद हे रजेवर असल्याने आज गदगचे पोलीस अधीक्षक बी.एस.न्यामागौडा यांनी प्रभारी पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी हुक्केरी येथे झालेल्या शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बेळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
हुक्केरी तालुक्यातील इस्लामपूर येथील शेतकरी राजू खोतगी याने सावकार सिद्धव्वा बयण्णवर यांच्याकडून १.५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. ५ वर्षांच्या मुदतीनुसार घेतलेल्या रकमेची परतफेड करण्यासाठी अचानक सावकारांनी तगादा लावल्याने शेतकरी हतबल झाला. आपल्याला कर्जफेड करण्यासाठी आणखी थोडी मुदत द्यावी, अशी मागणी सावकाराकडे शेतकऱ्याने केली.
मात्र सावकाराने शेतकऱ्याचा मुलगा बसवराज खोतगी यांच्यासह पत्नी दुर्गव्वा खोतगी यांनाही नजरकैदेत ठेवले. यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने राहत्या घरी विषप्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी मृत शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी यमकनमर्डी पोलिसांना तक्रार दाखल करून घेण्याची विनंती केली.
परंतु पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास तयारी दर्शविली नाही असा आरोप मृत शेतकरी राजू खोतगी यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती बेळगावचे प्रभारी पोलीस अधीक्षक बी. एस. न्यामागौडा यांनी दिली.