बेळगाव लाईव्ह :हिंडलगा मध्यवर्तीय कारागृहामध्ये गुंडा कायद्याखाली स्थानबद्धतेत असलेल्या एका कैद्याने कारागृहाच्या वाॅर्डनवर हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना नुकतीच घडली.
जखमी वॉर्डनचे नांव विनोद लोकापुरे असे आहे. तसेच कारागृहात सेवा बजावणाऱ्या वाॅर्डन विनोदवर हल्ला करणाऱ्या कैद्याचे नांव राहील पाशा उर्फ राहुल (रा. हासन) असे आहे. हल्लेखोर कैदी राहील पाशा हा गुंडा कायद्याखाली स्थानबद्धतेत असून हासन येथून अलीकडेच त्याला हिंडलगा कारागृहात हलविण्यात आले आहे. या ठिकाणी आल्यानंतरही त्याच्यात सुधारणा झालेली नाही. त्याच्याविरुद्ध कारागृहात गोंधळ घालणे आणि विनाकारण मारहाणीच्या तक्रारी आहेत. अंधार कोठडीत असलेला राहील पाशा अलीकडे काही दिवसांपासून आपली तब्येत खालावली असून उपचारासाठी मला हॉस्पिटलमध्ये दाखल करा अशी मागणी करत होता. गेल्या रविवारी सायंकाळी देखील त्याने वॉर्डन विनोद लोकापुरे यांच्याकडे तशी मागणी केली. त्यावेळी वॉर्डन लोकापूर यांनी हा विषय माझ्या अखत्यारीत येत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संमती दिल्यास वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जाऊ असे उत्तर दिले. यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडवून त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. यावेळी राहुल पाशा याने लोकापुरे यांच्या हातातील काठी हिसकावून त्यांना काठीने व लाथा बुक्क्याने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी राहुल पाशा याच्यावर भादवि 323, 324, 353, 504 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी वॉर्डन विनोद लोकापूर यांना उपचारासाठी बीम्स अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.