बेळगाव लाईव्ह : ‘हम दो हमारे बारह’ हा सिनेमा येत्या ७ जून रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. पण त्याआधीच या सिनेमाच्या प्रदर्शनाला तीव्र विरोध होत असल्याचं पाहायला मिळत असून या सिनेमावरुन सध्या राजकीय वातावरण देखील तापलं असल्याचं चित्र आहे. दरम्यान या चित्रपटाच्या विरोधात आज बेळगावमधील मुस्लिम संघटनेच्यावतीनेही निदर्शने करण्यात आली.
कमल चंद्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात इस्लाम धर्माविषयी चुकीच्या गोष्टी दाखविण्यात आल्या असून इस्लाम धर्मियांचा पवित्र ग्रंथ असणाऱ्या कुराण विषयीही चुकीच्या गोष्टी मांडण्यात आल्या आहेत.
इस्लाम धर्माविषयी चुकीची माहिती पसरवून समाजात द्वेष निर्माण होईल असे प्रसंग या चित्रपटात दाखविण्यात आले आहेत. यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा चित्रपट प्रदर्शित केला जाऊ नये या मागणीसाठी आज बेळगावमध्ये एसडीपीआय संघटनांच्यावतीने आंदोलन छेडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा चौकात एसडीपीआयच्यावतीने छेडण्यात आलेल्या आंदोलनात चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना संघटनेच्या नेत्यांनी, चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांना अटक करण्याची मागणी केली. चित्रपट केवळ मनोरंजनासाठी असतात.
मनोरंजनातून करमणूक आणि समाजप्रबोधन करणे आवश्यक असते. मात्र सदर चित्रपटात मुस्लिम समाजाचा अपमान करण्यात आला असून कोणत्याही चित्रपटाने समाजाची बदनामी करू नये, कोणत्याही कारणास्तव हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.