बेळगाव लाईव्ह :हलगा -मच्छे बायपास रस्त्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी मिळविलेला स्थगिती आदेश उच्च न्यायालयाने आज मागे घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून आता पुन्हा या बायपास रस्त्याच्या कामाला प्रारंभ होणार आहे.
हलगा -मच्छे बायपास रस्त्याच्या विरोधात गेल्या कांही वर्षापासून सातत्याने विविध प्रकारची आंदोलने छेडण्याद्वारे शेतकरी जोरदार लढा देत आहेत. अलीकडे या बायपास रस्त्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयातून स्थगिती आदेशही मिळवला होता.
मात्र त्या स्थगितीच्या विरोधात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वकिलांनी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर सुनावणी होऊन काल सोमवारी निकाल देण्यात येणार होता. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सदर रस्ता हा वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे.
याचबरोबर रस्त्याचे कामही पूर्णत्वाकडे आले आहे. त्यामुळे हा रस्ता पूर्ण करण्यासाठी आम्हाला मुभा द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वकिलाने केली होती. शेतकऱ्यांचे वकील ॲड. रवीकुमार गोकाकर यांनी त्या विरोधात शेतकऱ्यांची भूमिका मांडली होती. काल दोन्ही वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत निकाल देण्यात आला नाही.
न्यायालयाने सदर निकाल आज मंगळवारी सकाळी जाहीर केला असून हलगा -मच्छे बायपास रस्त्याच्या बांधकामावरील स्थगिती उठवली आहे. त्यामुळे आता पुन्हा या रस्त्याचे काम वेगाने सुरू होणार आहे.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. मध्यंतरी काही शेतकऱ्यांनी बायपासच्या विरोधातून घेतलेल्या माघारीमुळे स्थगिती उठल्याचा आरोप होत असून संबंधित शेतकऱ्यांबद्दल बायपास विरुद्ध लढा देणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.