बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील उचगाव येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री मळेकरणी देवस्थानाच्या ठिकाणी देवीला बकऱ्याचा मान देण्यात येतो त्यावेळी टाकाऊ अवयवांची योग्य विल्हेवाट लावली जात नाही. याकडे आरोग्य अधिकाऱ्यांसह ग्राम पंचायतीने गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी अथवा अन्यत्र ठराविक सुरक्षित ठिकाणी बकऱ्यांचा मान देण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
उचगाव येथील त्रस्त नागरिकांनी उपरोक्त मागणीचे निवेदन नुकतेच पंचायत विकास अधिकारी (पीडीओ), आरोग्य अधिकारी, ग्रामपंचायत अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांना सादर केले आहे. देवीला बकऱ्याचा मान दिल्यानंतर त्यांचे रक्त व टाकाऊ अवयवांची मळेकरनी देवस्थान कमिटीतर्फे योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे गावात दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी आम्ही यासंदर्भात आपल्याला कल्पना दिली आहे. मात्र आता परिस्थिती आणखीनच बिघडली आहे. तेंव्हा आपण तात्काळ कार्यवाही करावी, जर कार्यवाही करणार नसाल तर योग्य कारणासह त्याचे लेखी स्पष्टीकरण द्यावे.
विशालगड, दड्डी (श्री भावकेश्वरी मंदिर), कक्केरी (श्री बिष्टांमा देवी मंदिर), कोडली (श्री माऊली मंदिर), तुळजापूर (श्री तुळजाभवानी मंदिर) आणि गुंजेनहट्टी (श्री होळी कामान्ना मंदिर) या ठिकाणी लोकसंख्या तसेच पर्यावरण प्रदूषण व अस्वच्छता वाढल्यामुळे तेथील ग्रामपंचायत, नगरपालिका वगैरे स्थानिक प्रशासनाने आरोग्य व पर्यावरण सुरक्षेसाठी प्राण्यांचा मान देण्यासाठी स्वतंत्र वेगळे ठिकाण कायमस्वरूपी निश्चित केले आहे.
त्या ठिकाणी अशी व्यवस्था केली जाऊ शकते तर उचगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील श्री मळेकरणी मंदिराच्या बाबतीत का नाही? तेंव्हा याचा गांभीर्याने विचार करून तात्काळ आवश्यक कार्यवाही करावी, अशा आशयाचा मजकूर निवेदनात नमूद आहे. निवेदनावर रोहन युवराज कदम, अलबान फर्नांडिस, लक्ष्मण खांडेकर, अनिल पाटील, दीपक कांबळे, शिल्पा कांबळे, संजय फर्नांडिस, ए. एन सुभेदार, नंदा चौगुले, यल्लाप्पा पावशे, आर. ए. सुभेदार, रतन कदम वगैरे असंख्य गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
उचगाव (ता. जि. बेळगाव) येथील श्री मळेकरणी देवस्थानाच्या ठिकाणी दर मंगळवार व शुक्रवारी बकऱ्यांचा मान दिला जातो. मान देण्यात येणाऱ्या बकऱ्यांचे टाकाऊ अवयवांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याऐवजी त्यांचा गटारीवाटे नजीकच्या मार्कंडेय नदीत निचरा केला जात आहे. त्यामुळे गावच्या गटारीमध्ये बकऱ्यांचे अवयव वाहून येत असून त्या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. परिणामी नदी प्रदूषित होण्याबरोबरच गावात दुर्गंधीचे वातावरण निर्माण होऊन लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
पूर्वीच्या तुलनेत गेल्यात जानेवारीपासून श्री मळेकरणी मंदिराच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बकरी पडत असल्यामुळे परिस्थिती अधिकच बिघडली आहे. सध्या बेळगावकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यावरील उचगाव नाक्यापर्यंत गटारातील अवयवांची उग्र दुर्गंधी पसरली आहे. या खेरीज घराघरात दुर्गंधी पसरून डास, माशांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
गावच्या वेशीवर बस थांबा असून शेजारीच असलेल्या दुर्गंधीयुक्त गटारीमुळे त्या ठिकाणी शाळेला जाणारे विद्यार्थी विद्यार्थिनी आणि बेळगावला जाणाऱ्या लोकांना नाक मुठीत धरून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार बकऱ्यांचा मान देण्यात आल्यानंतर त्यांच्या टाकाऊ अवयवांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ ठेवण्यासंदर्भात आरोग्य अधिकाऱ्यांनी यापूर्वी मळेकरणी देवस्थान कमिटीला नोटीसही बजावली आहे.
मात्र त्याकडे दुर्लक्ष करून सार्वजनिक गटारीचा वापर केला जात आहे. त्याचप्रमाणे देवीला बकऱ्याचा मान देणाऱ्या भक्तांकडून देवस्थान कमिटी 200 रुपये घेऊन पावती फाडत असते. या पैशांचा विनियोग कोठे केला जातो? हा संशोधनाचा विषय असला तरी सदर पैशाचा वापर बकऱ्यांचा मान दिल्यानंतर आवश्यक असलेल्या स्वच्छतेसाठी केला जाऊ शकतो, असे जागरूक नागरिकांचे मत आहे.