बेळगाव लाईव्ह :मागील वर्षाप्रमाणे शहर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सकल मराठा समाज बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शहर परिसरातील चित्ररथ मिरवणुकीतील पात्रांना मोफत रंगभूषा मेकअप करण्याच्या उपक्रमाला आज उत्साहात प्रारंभ झाला.
या उपक्रमांतर्गत आज शुक्रवारी वडगाव परिसरातील आणि उद्या शनिवारी बेळगाव शहराच्या मुख्य मिरवणुकीसाठी देखाव्यात सहभागी पात्रांची रंगभूषा केली जाणार आहे.
बेळगाव शहरांमध्ये दरवर्षी पारंपारिक पद्धतीने शिवजयंती साजरी केली जाते. यानिमित्ताने अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी शिवजयंतीची भव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाते. त्यानुसार उद्या शनिवारी शहरात या चित्ररथ मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
तत्पूर्वी आज वडगाव भागात शिवजयंती मिरवणूक निघणार आहे. या दोन्ही मिरवणुकीत चित्तवेधक शिवकालीन देखावे सादर केले जात असतात. यापूर्वी हे देखावे सादर करताना त्यामध्ये सहभागी कलाकारांची रंगभूषेच्या बाबतीत गैरसोय होत होती.
ही गैरसाई दूर करण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून सकल मराठा समाजाच्या सहकार्याने महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे चित्ररथ मिरवणुकीत सहभागी पात्रांची रंगभूषा मोफत करून देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. सध्या खासबाग डबल रोड येथील लक्ष्मण निवास, तळमजला येथे आज दुपारी 3 वाजल्यापासून हा उपक्रम सुरू आहे.
सदर उपक्रमाच्या संदर्भाने बोलताना गुणवंत पाटील यांनी दर्जेदार रंगभूषा असेल तर देखाव्यातील पात्रे उठावदार दिसतात. त्या अनुषंगाने गेल्या तीन वर्षापासून महाराष्ट्र एकीकरण समिती व सकल मराठा समाज यांच्यावतीने उत्तम निपुण अशा रंगभूषाकारांच्या मदतीने बेळगावच्या शिवजयंती मिरवणुकीतील पात्रांची वेशभूषा मोफत करून दिली जात असल्याचे सांगितले.
तसेच गेली 3 वर्षे नि:स्वार्थ भावनेने रंगभूषेचे काम करणाऱ्या रंगभूषाकारांचे पाटील यांनी भरभरून कौतुक केले. तसेच इतर गोष्टींबरोबरच या रंगभूषाकारांच्या योगदानामुळेच बेळगावची शिवजयंती मिरवणूक देशातच नव्हे तर जगभरात सुपरिचित झाली आहे, असे सांगून प्रामुख्याने समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या भक्कम पाठिंबामुळे महाराष्ट्र एकीकरण समिती व सकल मराठा समाज हा उपक्रम यशस्वी करत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
अन्य एका समिती नेत्याने या उपक्रमांतर्गत दरवेळी 150 -200 पात्रांची मोफत रंगभूषा करून दिली जाते असे सांगितले. मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मिता टिकवण्यासाठीचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न असल्याचे नमूद करण्याबरोबरच शहरातील शिवजयंती उत्सव मंडळाने या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.