बेळगाव लाईव्ह :बेळगावचे ट्रेकर्स अविनाश दोड्डन्नावर, देविना दोड्डन्नावर आणि सुषमा भट यांनी जगातील सर्वात उंच अशा एव्हरेस्ट शिखरावर 17,750 फूट (5350 मी.) उंचीवर असलेला एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक हा जगातील सर्वोत्तम ट्रेकपैकी एक असलेला ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे.
माउंट एव्हरेस्ट हे 29,029 फूट (8,848.68 मी.) इतक्या उंचीचे शिखर जगातील सर्वात उंच पर्वत शिखर मानले जाते. या शिखरावर 5350 मी. उंचीवर असलेला एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक (ईबीसी) हा सर्वात जास्त मागणी असलेला आणि खडतर ट्रेक म्हणून प्रसिद्ध आहे.
तीव्र उतार आणि प्रतिकूल हवामानामुळे या ठिकाणी ट्रेकिंग करण्यासाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि मानसिकदृष्ट्या शिस्तबद्ध असणे आवश्यक आहे. ट्रेकिंगचा हा प्रवास तुम्हाला चित्तथरारक उंचच्या उंच लँडस्केप, गूढ बौद्ध मठ, पारंपारिक शेर्पा गावे, उतीउंचावरील वनस्पती, प्राणी आणि बर्फाच्छादित पर्वतांमधून घेऊन जातो.
इतकेच नव्हे तर चो ओयू (8188 मी.), ल्होत्से (8516 मी.), नुपत्से (7861 मी.), पुमोरी आणि अमा दाबलाम यांसारख्या आजूबाजूच्या शिखरांचे विस्मयकारक दृश्यही पाहायला मिळते.
एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंतचे ट्रेकिंग पूर्ण करणे हा ट्रेकिंगमधील मैलाचा दगड मानला जातो. जो बेळगावच्या सुषमा भट, देविना दोड्डन्नावर आणि अविनाश दोड्डन्नावर यांनी गाठला आहे.
या त्रिमूर्तींनी 12 ते 4 अंश तापमानात 12 दिवस 120 कि.मी. चालत हा कठीण आणि भव्य ट्रेक पूर्ण केला. बेस कॅम्प जेथे त्यांनी प्रेक्षणीय खुंबू हिमनदी तसेच माउंट एव्हरेस्टचे प्रभावी शिखर जवळून पाहण्याचा एक अविस्मरणीय अनुभव घेतला. एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल उपरोक्त तिघांचे ट्रेकर्स परिवारात अभिनंदन व कौतुक होत आहे.