बेळगाव लाईव्ह :गोल्फ कोर्स येथील माॅर्निंग वाॅकर्स क्लबच्या सदस्यांतर्फे यमकणमर्डी येथे आयोजित पर्यावरण संरक्षणासंदर्भातील एक छोटेखानी स्तुत्य कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला.
सदर कार्यक्रमात बोलाताना पर्यावरण तज्ञ व ज्येष्ठ समाजसेवक डाॅ. शिवाजी कागणीकर यांनी मानवी हस्तक्षेपाने होणाऱ्या पर्यावरण ऱ्हासाच्या दुष्परिणामाबाबत मार्गदर्शन केले. तसेच आपण बंबरगा, कट्टनभावी, निंगेनहट्टी व गोरामट्टी येथे लोकसहभागातून निर्माण केलेल्या ‘पाणी अडवा, पाणी जिरवा व झाडे लावा’ प्रकल्पांबद्दल (वाॅटरशेड प्रोजेक्ट) माहीती दिली.
बंबरगा येथे दोन डोंगराच्यामध्ये तयार केलेला छोटा बंधारा व त्या खालील विहीर, कट्टनभावी येथील तलाव व 2 विहीरी, निंगेनहट्टी येथे दोन तलाव व गोरामट्टी येथील 2 विहीरी तसेच या संपूर्ण पंचक्रोशीत डोंगराच्या उतारावर समांतर चरी खोदून त्याशेजारी लावलेल्या जवळपास अडीज लाख झाडांमूळेचं पाणी साठवणे शक्य झाल्याचेही डाॅ. कागणीकर यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी ॲड. एन. आर. लातूर, प्रविण खोडा, डाॅ. समीर नाईक, राजू खोडा, गिरीश हत्तरगी या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी पर्यावरणाला मदत करणारा गोवंश सोबत घेऊन शाश्वत शेती करण्याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच हे ठिकाण भविष्यकाळात इतरांसाठी एक पायलट प्रोजेक्ट ठरावा असे मत लातूर यांनी व्यक्त केले. यावेळी यमकणमर्डीजवळ मंगलदिप जैन विहार भवन येथे करत असलेल्या वाॅटरशेड प्रोजेक्ट बाबत जमलेल्या सर्वांनी कुतूहल दाखविले व प्रोजेक्टला शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते चंदनाचे रोपटे लावण्याद्वारे गिरीश हत्तरगी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला निवृत्त न्यायाधीश उल्हास बाळेकुंद्री, विजय पोरवाल, राजेश कामत, मारूती सांबरेकर, शंकर नाडगौडा, पत्रकार शिवराय योळकोटी, महांतेश बिसीरोटी, परशुराम गुरव, शिवाजी धुराजी, आनंद जमखंडी, भोला व इतर मंडळी उपस्थित होती.
राहुल पाटील यांनी सर्वांना मंगलदिप जैन विहार भवन येथील वाॅटरशेड प्रोजेक्ट फिरून दाखवत त्याबद्दल थोडक्यात माहीती दिली. तसेच येत्या काळात अजून दोन/तीन ठिकाणी याचप्रमाणे वाॅटरशेड प्रोजेक्ट हाती घेणार आहोत असे सांगितले. अखेर स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.