बेळगाव लाईव्ह: सीमाप्रश्नी महाराष्ट्राकडे आस लावून बसलेल्या सीमावासियांच्या आशेवर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाणी फेरले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमाभागात भाजपच्या उमेदवारासाठी आज त्यांनी प्रचार सभा घेतली.
सायंकाळी ५.०० वाजता विशेष विमानाने बेळगावकडे निघालेले एकनाथ शिंदे ६.०० वाजता विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर खानापूर येथील जांबोटी क्रॉस येथे सायंकाळी ६.४५ वाजता उत्तर कन्नडा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार विश्वेश्वर कागेरी हेगडे यांच्यासाठी सभा घेतली. विशेष म्हणजे हा भाग महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला असूनही या भागात एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराविरोधातच सभा घेतली.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, हि वेळ मतदारसंघाचा नव्हे तर देशाचा नेता निवडण्याची आहे. विकास आणि प्रगती साधण्याची आहे. भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. आज जगात भारताला जे स्थान प्राप्त झाले आहे ते केवळ मोदींच्या नेतृत्वामुळे शक्य झाले आहे. अकराव्या क्रमांकावर असणारी भारतीय अर्थव्यवस्था आज पाचव्या स्थानावर आली आहे.
कायदा आणि सुव्यवस्था राखत भ्रष्टाचाराचा एकही डाग नसलेल्या मोदींनी राम मंदिर निर्माण केले. ३७० कलम हटवला. अनेक घटकांमुळे काँग्रेसच्या राजवटीत देश खड्यात गेला होता. मात्र मोदी सरकारने आपल्या देशाला नवी व्याख्या दिली.
मोदींनी केलेल्या प्रगतीमुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. देशात पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदींना पाहायचे असेल तर उत्तर कन्नडा मतदार संघात विश्वेश्वर हेगडे कागेरी यांना विजयी करणे आवश्यक असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
व्यासपीठावर खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, माजी आमदार संजय पाटील, प्रमोद कचेरी, धनश्री सरदेसाई आदी उपस्थित होते.