बेळगाव लाईव्ह : हुतात्म्यांच्या प्राणाची आहुती घेऊन संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभारली गेली. राज्य पुनर्र्चनेनंतर बेळगावसह कारवार आणि एकूण ८६५ गावं महाराष्ट्रापासून तोडली गेली. गेल्या ६७ वर्षांपासून बेळगावसह संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात सामील होण्यासाठी तळमळत असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बेळगावमध्ये मराठी भाषिकांच्या, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधातच प्रचारासाठी आगमन केले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज खानापूर आणि बेळगावमध्ये प्रचारसभा घेत आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत अधिकाधिक हुतात्मे शिवसेनेने दिले. याच शिवसेनेतून वर आलेल्या एकनाथ शिंदेनी सीमाप्रश्नी सीमा समन्वयक मंत्री म्हणूनही काम पाहिले. सीमासमन्वयक मंत्री म्हणून कार्यरत असताना एकदाही बेळगावकडे न फिरलेल्या एकनाथ शिंदे यांना निवडणुकीच्या तोंडावरच, बेळगावमधील मराठी भाषिकांच्या आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराविरोधात प्रचारासाठी यावं लागलं, हि शरमेची बाब आहे.
स्वायत्तता हरवलेले मुख्यमंत्री ईडीच्या दबावाने भाजपच्या गळाला लागल्यानंतर त्यांच्या गळ्यात पट्टा अडकवून त्यांना हवे तसे नाचवले जात आहे याचेच हे ज्वलंत उदाहरण म्हणावे लागेल. कधीकाळी एकनाथ शिंदे यांनी सीमाप्रश्नासाठी कारावास भोगला होता आणि भाजपच्या दुराग्रहाने आज शिंदेंना समितीच्या उमेदवारांविरोधातच प्रचार करण्यासाठी बेळगावात यावं लागत आहे हा दैवदुर्विलास आहे…!
भारतातील एकंदर राजकारणाची दशा आणि दिशा हि भाजपच्या ईडीच्या धोरणामुळे लक्तरे उडाल्यासारखी झाली आहे. वाघांची सेना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवसेनेकडे भाजपने शेळीएवढीही स्वायत्तता ठेवली नाही. जर हि स्वायत्तता शिंदेंकडे असती तर शिंदे आज आपल्या मनाप्रमाणे वागले असते किंबहुना आपला प्रत्येक क्षण त्यांनी समितीच्या उमेदवारासाठी घालवला असता. मात्र याउलट त्यांना समितीच्या उमेदवाराविरोधात प्रचार करावा लागत आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘झमोरे, बीवी मायके गई है, तुम उसको ले के आओ’ असे म्हणणाऱ्या दरवेशासारखा भाजप आणि शिंदेचा खेळ सुरु असल्याचा भास होत आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गुजराथच्या पंतप्रधानांमुळे कोलांट्या उड्या खाव्या लागत आहेत, हि सत्यपरिस्थिती आहे.
१९८६ साली झालेल्या कन्नड सक्ती आंदोलनात, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रियपणे सहभाग घेतलेल्या एकनाथ शिंदे यांना सीमाभागातील संपूर्ण परिस्थिती यथोचित माहीत आहे. याचप्रमाणे सीमालढ्याची जाणीवही आहे. मात्र तरीही केवळ सत्तेच्या लालसेपोटी सुरु असणाऱ्या राजकारणात केंद्रीय नेतृत्वाला बळी पडून त्यांनी मराठी भाषिकांच्या विरोधात प्रचारात उडी घेतली आहे. एकनाथ शिंदे यांचा समितीविरोधी प्रचारासाठी आयोजिण्यात आलेला दौरा मराठी भाषिकांचा अपमान आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सीमावासीयातून उपस्थित होत आहे.
एकनाथ शिंदे यांना भाजपकडून सीमाभागात प्रचार करण्यासाठी दबाव सुरु असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे. आजवर सीमाभागात प्रचारासाठी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी उपस्थिती दर्शविली होती. केंद्रीय नेतृत्वाच्या दबावाखाली अनेक नेत्यांनी सीमाभागाचा दौरा प्रचारासाठी केला. मात्र आजतागायत शिवसेनेचे नेते प्रचारासाठी कधीच फिरकले नाहीत. एकनाथ शिंदे यांच्या रूपात पहिल्यांदाच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराविरोधात शिवसेनेचा नेता बेळगावात दाखल झाला. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळत आहेत.
एका अर्थी मुख्यमंत्री हेच सीमावासीयांचे पालक असतात, तारणहार असतात. सीमालढ्याचे नेतृत्वही मुख्यमंत्र्यांनीच करावे लागते. मात्र या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय नेतृत्वाला बळी पडून एकनाथ शिंदे यांनी बेळगाव गाठल्याने सीमावासीयातून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.