बेळगाव लाईव्ह :भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्याची मोठी समस्या बेळगाव जिल्ह्यातील रहिवाशांना भेडसावत आहे. गेल्या 16 महिन्यांत कुत्रा चावल्याची 44,417 प्रकरणे नोंदवली गेल्याची धक्कादायक माहिती जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने दिली आहे. या प्रकरणांमध्ये 2023 मधील 34,479 घटनांसह जानेवारी ते एप्रिल 2024 पर्यंतच्या अतिरिक्त 9,938 घटनांचा समावेश आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश कोणी यांनी कुत्रा चावलेल्यांना आरोग्य विभाग उपचार देऊ शकत असला तरी भटक्या कुत्र्यांना आटोक्यात आणण्याची खरी समस्या महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायतींवर आहे, यावर भर दिला आहे. ही बाब डॉ. कोणी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत, तात्काळ व प्रभावी कार्यवाहीची मागणी केली आहे.
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या वावरामुळे समाजातील विविध गटांना मोठा धोका निर्माण झाला आहे. शाळेत जाताना किंवा खेळताना लहान मुलांवर हल्ले होत आहेत, कामावरून घरी जाणाऱ्या कामगारांना धोका आहे, वृद्ध लोकही सुरक्षित नाहीत.
निवासी भागात भटक्या कुत्र्यांचे कळप दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांना त्यांच्याच परिसरात असुरक्षित वाटू लागले आहे. एकट्या बेळगाव शहरात अंदाजे 15,000 भटक्या कुत्र्यांचा वावर असून, 77,000 हून अधिक कुत्री संपूर्ण जिल्ह्यात विखुरलेली आहेत.
गेल्या दोन वर्षांत जिल्हा प्रशासनाकडून वारंवार इशारे आणि सूचना देऊनही स्थानिक अधिकारी प्रभावी नियंत्रण उपाययोजना राबवण्यात अपयशी ठरले आहेत.
भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी बेळगावच्या वकिलांनी ॲड. अन्वर नदाफ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाला नुकतेच सक्त अल्टिमेटम दिले असून 15 दिवसांत कारवाई न झाल्यास हे प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयात नेण्याचा इशारा दिला आहे.
ॲड. नदाफ यांनी निदर्शनास आणून दिले की, उच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वसंरक्षणार्थ भटक्या कुत्र्याना ठार करण्याचे अधिकार दिले आहेत. तथापी या उपायाची सातत्याने अंमलबजावणी केली जात नाही. “माणसापेक्षा अधिक मौल्यवान प्राणी नाही”, असेही ते म्हणाला.