बेळगाव लाईव्ह : भटक्या कुत्र्यांचा उपदव्याप कमी होता होत नसून आज न्यू गांधी नगर येथे पुन्हा भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन लहानगे जखमी झाले आहेत.
न्यू गांधीनगर येथील निझामीया गल्ली येथील कैफ पाच्छापूर आणि ऐझाल पठाण या दोन बालकांवर कुत्र्यांनी हल्ला केला. भर दुपारी घडलेल्या या घटनेत दोन्ही मुले गंभीर रित्या जखमी झाली आहेत. मागील चार दिवसांपूर्वीच उज्वलनगर येथेही भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडली होती.
त्यानंतर पुन्हा आज हि घटना घडल्याने नागरीकातून भीतीचे वातावरण आहे. आज न्यू गांधीनगर येथे झालेल्या या घटनेतील मुलांपैकी एका मुलाच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यासारखी परिस्थिती उद्भवली असून जखमी मुलांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मनपाने गेल्या काही दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्यांची नसबंदी मोहीम हाती घेतली होती. परंतु हि मोहीम काही दिवसातच थंडावली असून शहरासह ग्रामीण भागातही भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढत असल्याच्या घटना सातत्याने घडत असल्याच्या तक्रारी नागरीकातून होत आहेत.
मनपाच्या या बेदरकार कामकाजामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत असून भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाचा अधिकाधिक फटका चिमुरड्यांनाच बसत असल्याचे पुढे आले आहे. भटक्या कुत्र्यांच्या या समस्येकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष पुरविणे गरजेचे आहे.