बेळगाव लाईव्ह:गवत उगवायला किमान दोन महिने लागत असल्यामुळे सध्या वळीवाने हजेरी लावली असली तरी प्रशासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा -वैरण पुरवण्याची योजना बंद न करता किमान 2 महिने सुरू ठेवावी, अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघटनेने केली आहे.
कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवारी सकाळी जोरदार निदर्शने करून उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सहायकांनी निवेदनाचा स्वीकार करून मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार म्हणाले की, रयत संघटनेच्या नेतृत्वाखाली आज बेळगाव जिल्ह्यातील आम्ही शेतकरी येथे जमलो आहोत.
सरकार प्रशासनाकडून जनावरांसाठी वैरण -चाऱ्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र एक दिवस पाऊस पडला तो देखील जिल्ह्यात सर्वत्र नाही. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे पाऊस पडला आणि लगेच चाऱ्याचे गवत उगवले असे होत नाही. आज पाऊस पडला तर चारा उगवायला किमान दोन महिने लागतात.
त्यामुळे आमची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी आहे की पाऊस पडला तरी किमान 2 महिने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा -वैरण देण्याची योजना सुरू ठेवावी.
अद्याप मान्सूनला सुरुवात झालेली नाही. सध्या वळीवाचा पाऊस पडत असून या पावसामुळे लगेच चारा उगवणार नाही अशी माहिती देऊन तेंव्हा आणखी किमान 2 महिने प्रशासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा -वैरण पुरवली पाहिजे, असे अशी मागणी पोवार यांनी केली. यावेळी रयत संघटनेचे अन्य पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.