बेळगाव लाईव्ह:श्री मळेकरणीनिमित्त उचगाव येथे दर मंगळवारी आणि शुक्रवारी होणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि वाढलेला तळीरामांचा उपद्रव यावर उपाययोजना करण्याची मागणी डॉ. सोनाली सरनोबत यांनी केली होती.
त्याचप्रमाणे बेळगाव लाईव्हने देखील तळीरामांच्या उपद्रवाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन वाहतूक कोंडी सोडवण्याबरोबरच मद्यपींचा बंदोबस्त करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी दिले आहे.
उचगाव (ता. जि. बेळगाव) येथील श्री मळेकरणी देवस्थानाच्या ठिकाणी दर मंगळवारी व शुक्रवारी भरणाऱ्या मळेकरणी यात्रेला भाविकांची मोठी गर्दी होते. परिणामी त्यादिवशी बेळगावकडे येणाऱ्या हमरस्त्यासह उचगावच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असते.
या खेरीज श्री मळेकरणीच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांपैकी बहुसंख्या पुरुष भावी हे मद्यपी असल्यामुळे त्यांचा उपद्रव वाढला आहे. भांडण -तंट्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सदर कळीरामांच्या उपद्रवामुळे शेताकडे जाणाऱ्या किंवा परतणाऱ्या महिलांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मंगळवार आणि शुक्रवारी महिला कामावर जाणे टाळत आहेत. मद्यपी भाविक आसपासच्या शेतात जाऊन दारू पीत आहेत.
दारूच्या नशेत भांडण -तंटे करण्याबरोबरच कचरा फेकून अस्वच्छता निर्माण करणे दारूच्या बाटल्या फोडणे आदी प्रकार त्यांच्याकडून केली जातात. सदर प्रकारांना आळा घालण्याबरोबरच वाहतूक सुरळीत करण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना पोलीस उपायुक्त (डीसीपी) पी. व्ही. स्नेहा यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.