बेळगाव लाईव्ह – लोकसभा निवडणूक कार्यासाठी वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाकडून एक हजार पाचशे चोवीस बसेस निवडणूक आयोगाला उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवस परिवहन सेवेवर परिणाम जाणवणार आहे.परिवहन मंडळांनी दोन दिवस विविध मार्गांवरील बससेवा रद्द केल्या आहेत.सहा व सात मे रोजी शहर व ग्रामीण मार्गावरील बसेस कमी असणार आहेत.
मतदान कार्यासाठी म्हणून हुबळी ग्रामीण आगारातून 85 बसेस सह शहर आगारातून 84,धारवाड 124,गदग 132,बेळगाव 169,कारवार 137,हावेरी 224,चिकोडी 350 आणि बागलकोट मधून 279 अशी एकूण 1524 बसेस निवडणूक कार्यासाठी असणार आहेत. यामुळे सोमवारी व मंगळवारी वाहतूक सेवेत व्यत्यय येणार आहे.
*संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू:जिल्हाधिकारी नितेश पाटील*
बेळगाव – लोकसभा निवडणुकीसाठी उद्या मंगळवार दिनांक 7 मे रोजी मतदान होत आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. निर्भयपणे मतदान पार पाडण्यासाठी सुमारे दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त बेळगाव जिल्ह्यात तैनात करण्यात आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात 144 कलम लागू करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली आहे.
उद्या मतदानाच्या दिवशी राजकीय पक्षांना प्रत्येक मतदान केंद्राच्या 200 मीटर बाहेर एक टेबल आणि दोन खुर्ची ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. ज्यांना मतदान कार्ड मिळालेले नाही. त्यांना मतदान यादीमध्ये नाव असल्यास मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मुभा देण्यात आली आहे.
मतदान करण्यासाठी त्या व्यक्तीने आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड,बँक पासबुक, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड, भारतीय पासपोर्ट, निवृत्त वेतन कार्ड, नोकरी करत असलेले कोणत्याही प्रकारचे आयडेंटिटी कार्ड यामधील एखादे कार्ड असेल तर त्यांना मतदानाचा हक्क दिला जाणार आहे.
लोकसभा निवडणूक मतदानाच्या पार्श्वभूमीवर काल सायंकाळपासूनच मद्य विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. पुढील तीन दिवस मद्य विक्री व पुरवठा बंद राहणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली आहे.