बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरावा असा नाला या भागात असूनही प्रशासकीय यंत्रणेचा गलथानपणा, नागरिकांचा बेजबाबदारपणा, कारखाने, खाजगी संस्थांची मनमानी यामुळे हा नाला या भागातील शेतकऱ्यांसाठी शापच ठरत आला आहे.
या नाल्याची सफाई करण्यात यावी, खोली वाढविण्यात यावी अशी मागणी सातत्याने पुढे येत होती. यानंतर आता या नाल्याच्या सफाईचे कामकाज हाती घेण्यात आले असून शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे.
साधारण २७ किलोमीटर लांब पल्ल्याच्या या नाल्यात शहरातील पाण्याचा निचरा होतो. संपूर्ण शहरातील गटारी, नाले, ड्रेनेज वाहिन्यांचे पाणी याप्रकारे शहरातील पाण्याचा निचरा याच बळ्ळारी नाल्यातून होतो. मात्र या नाल्यात मोठ्या प्रमाणात गवत, झाडे-झुडपे आणि जलपर्णीचा विळखा पडल्याने पावसाळ्यात येथील शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागण्याची वेळ येत होती.
पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी या नाल्याच्या समस्येकडे लक्ष पुरविण्याची मागणी पुढे येत असताना आज बळ्ळारी नाला सफाई करण्यासाठी नेमलेल्या कमिटीच्या पुढाकारातून नाल्याची सफाई, गाळ काढण्याचे कामकाज हाती घेण्यात आले आहे.
कृषीपत्तीन सहकारी संस्थेचे अध्यक्ष अमोल देसाई, संचालिका माधुरी बिर्जे, शट्टूप्पा बेळगावकर, कीर्तिकुमार कुलकर्णी, कृष्णा गडकरी आदींच्या सहभागातून बळ्ळारी नाला गाळ काढण्यासाठी कमिटी नेमण्यात आली आहे. या कमिटीच्या माध्यमातून आज गाळ काढण्याच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली असून धामणे बळ्ळारी नाला ब्रिज ते येळ्ळूर ब्रिज या पल्ल्याची स्वच्छता पहिल्या टप्प्यात करण्यात येणार आहे. यानंतर दुसऱ्या टप्प्याला तातडीने सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती कमिटीच्या सदस्यांनी दिली आहे.
बेळगावच्या पूर्वेस मच्छे गावापासून सुरू होणारा तिथून पुढे यरमाळ, अनगोळ, वडगाव, शहापूर, हलगा, बसवन कुडची, सांबरा शिवारांमार्गे वाहणाऱ्या या बळ्ळारी नाल्याला शहरातील लेंडी नाल्याचे पाणी देखील मिळते. एकंदर पावसाळ्यात बेळगाव पूर्व भागातील पाणी मोठ्या प्रमाणात या नाल्यातून वाहत असते. या पार्श्वभूमीवर सदर नाल्याची साफसफाई करून गाळ काढून खोली वाढविणे आणि अतिक्रमण हटवून नाल्याची रुंदी वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे निदान आता मोक्याच्या ठिकाणी तरी जेसीबीद्वारे खोदकाम करून जलपर्णी व गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याने दिलासा मिळणार आहे.
बळ्ळारी नाल्याची खोली वाढविण्याची मागणी सातत्याने होत आहे. यापूर्वी साधारण ३० वर्षांपूर्वी या नाल्याची स्वच्छता करण्यात आली होती. या नाल्यात मोठ्या प्रमाणात बेळगावमधील एका मोठ्या खाजगी रुग्णालयाचे सर्व दूषित पाणी मिसळते. याचप्रमाणे स्मार्ट सिटीमधील अनेक ठिकाणचे पाणी कचऱ्यासहित या नाल्यात वाहून येत असल्याने पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यास समस्या निर्माण होतात.
नालाग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून तुटपुंजी नुकसान भरपाई देण्यात येत होती, याचा निषेध अनेकवेळा शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र नाल्याची प्रमुख समस्या असणारी खुदाई हाती घेण्यात आल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.