बेळगाव लाईव्ह विशेष : विविध ठिकाणी भरविल्या जाणाऱ्या यात्रा, जत्रा, उरूस यासारख्या गोष्टी पूर्वापार चालत आल्या आहेत. या सर्व गोष्टींमध्ये पूर्वजांनी, वडिलधाऱ्यांनी आणि समाजधुरीणांनी विशेष उद्देश जोपासला होता. या उद्देशातूनच यात्रा, जत्रा, उत्सव, उरूस साजरे केले जायचे. मात्र अलीकडे या सर्व गोष्टींचा मूळ उद्देश बाजूला सारून चंगळवादाकडे वाटचाल सुरु असल्याचे चित्र जाणवत आहे. मागील शनिवारी सांबरा यात्रेनिमित्त बेळगाव सांबरा रोडवर अभूतपूर्व अशा मेगा चक्का जामचा सामना करावा लागला होता आज मंगळवारी उचगाव येथील श्री मळेकरणी देवी यात्रेनिमित्त पुन्हा ट्रॅफिक जाम पाहायला मिळाली यानिमित्ताने वरील प्रश्न उपस्थित होत आहे.
साधारण पन्नाशीच्या दशकात किंबहुना त्याहीआधी लोक काबाडकष्ट करत, मेहनत करत. प्रामुख्याने बहुजन समाज अधिकाधिक शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह करत असे. पूर्वी मनोरंजनासाठी कोणतीही साधने उपलब्ध नव्हती. हल्लीसारखी ठराविक कामाच्या तासांची गणितेही नव्हती. रात्रंदिवस काबाडकष्ट करून खऱ्याअर्थाने ‘बिझी शेड्युल’ असणाऱ्यांना आपल्या दैनंदिन जीवनातून, व्यस्त कामाच्या शैलीतून, कामातून थोडा विसावा मिळावा, विरंगुळा मिळावा, सर्वांना एकत्रित करून एकमेकांच्या मतांचा एकत्रित विचार जोपासत, सर्वांच्याच विचारांची धार्मिक व सामाजिक बांधिलकी जोपासली जावी, त्यानंतर पुन्हा नव्या जोमाने, नव्या उत्साहाने कामाची सुरुवात करता यावी, यासाठी यात्रा-उत्सवाचे नियोजन केले जायचे. मात्र अलीकडच्या यात्रा-जत्रांचे स्वरूप पाहता मूळ उद्देश बाजूला सरत चालल्याचे दिसून येत आहे. याचा प्रत्यय बेळगावमध्ये ठिकठिकाणी भरविण्यात आलेल्या महालक्ष्मी यात्रेदरम्यान आला असून अलीकडच्या यात्रा या केवळ जिभेचे चोचले पुरविण्यासाठी साजऱ्या केल्या जात असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.
पूर्वी अधिकाधिक नागरिक हे शेतीव्यवसायावर अवलंबून असल्याने बारमाही शेताच्या कामात व्यस्त असायचे. मात्र यातूनही शेतीच्या व्यवस्थापनातून वेळ काढून विविध पिकाच्या हंगामी कामातून थोडी विश्रांती मिळावी आणि पुन्हा मशागतीच्या, पेरणीच्या आणि सुगीच्या कामासाठी नवचैतन्य मिळावे, यात्रेच्या निमित्ताने सर्वजण एकत्रित यावेत आणि विचारांची, सुख-दुःखाची देवाणघेवाण व्हावी, या उद्देशाने यात्रा-उत्सवाचे नियोजन केले जायचे. श्रद्धा हि प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या स्तरावर पाळली जाते. मात्र यात्राकाळात श्रद्धा देखील बाजूला सारली जाऊन केवळ मांसाहार आणि मद्यपानाच्या पंगतीची संख्या अधिक वाढत चालल्याचे दिसून येते.
गेल्या काही वर्षात काकती येथे भरविण्यात आलेली श्री महालक्ष्मी यात्रा, खानापूरमध्ये भरविण्यात आलेली श्री महालक्ष्मी यात्रा, हिंडलगा येथील श्री महालक्ष्मी यात्रा अलीकडच्या काळात झालेली बेनकनहळ्ळी येथील श्री महालक्ष्मी यात्रा, सांबरा येथील श्री महालक्ष्मी यात्रा यासह विविध गावांमध्ये झालेली श्री महालक्ष्मी यात्रा याचप्रमाणे उचगाव येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री मळेकरणी देवस्थानात दर मंगळवारी आणि शुक्रवारी होणारी गर्दी… यादरम्यान शहरातील मध्यवर्ती ठिकाणांपर्यंत वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.
काहींनी देवीच्या भक्तीसाठी तर काहींनी पाहुणे-नातेवाईकांनी दिलेल्या आग्रहाच्या आमंत्रणापोटी, काहींनी मांसाहार – मद्यपानाच्या पंगतींसाठी तर काहींनी जत्रा ‘कॅश’ करण्यासाठी आपली पाऊले जत्रेच्या दिशेने वळविली. मात्र यादरम्यान जत्रेच्या मार्गावर झालेला चक्काजाम हा सर्वांसाठी त्रासदायक ठरला.
केवळ नियोजन किंवा गर्दी किंवा यात्रेचा उद्देशच बाजूला हटत नसून कित्येक गरीब, मध्यमवर्गीय आणि आर्थिक मागास कुटुंबांनाही यात्रेच्या पार्श्वभूमीवर आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. ज्यांची कुवत आहे ते नक्कीच यात्रा आनंदाने करतील. परंतु संपूर्ण गाव यात्रा करत असताना आपले कुटुंब मागे राहू नये यासाठी कर्ज काढून आर्थिक ताण सहन करून यात्रा करणारे देखील नागरिक आहेत. बहुजन समाज आजही म्हणावा तितका प्रगतशील नाही. मध्यमवर्गीयांमध्येही आता दोन टप्पे पडले असून उच्च आणि मध्यम अशा दोन टप्प्यात विभागल्या गेलेल्या मध्यमवर्गीयांनाही कुठे ना कुठेतरी आर्थिक ताण सहन करावा लागत आहे.
यात्रा म्हटलं कि केवळ जेवणाच्या पंगती उठत नाहीत. तर घराच्या रंगरंगोटीपासून येणाऱ्या पाहुण्यांसाठी, नातेवाईकांसाठी आहेर, फराळ आणि जेवणाच्या व्यवस्थेसाठी लागणारी सर्व सामुग्री एकत्रित करेपर्यंत कित्येकांच्या नाकीनऊ येतात. यामुळे हि एकंदर परिस्थिती पाहता यात्रेच्या मूळ स्वरूपाचा अवलंब करत यात्रेचा उद्देश जपावा आणि जोपासावा हे अत्यंत महत्वाचे बनले आहे.