बेळगाव लाईव्ह : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने काँग्रेसवर अनेक आरोप केले. टीकेची झोड उठवणाऱ्या भाजपाला आज सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी प्रत्त्युत्तर दिले.
आज मंगळवारी काँग्रेस भवन येथे आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सतीश जारकीहोळी यांनी स्थानिक समस्यांसह राज्यपातळीवरील विविध गोष्टींचा आढावा घेतला.
राज्यात निवडणुकीच्या तोंडावर अनेक घटना घडल्या. यात प्रामुख्याने हुबळी येथे झालेली दोन खून प्रकरणे हि अत्यंत घृणास्पद ठरली. या घटनांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले. यानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप करण्यात आला. मात्र या आरोपावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आकडेवारीनुसार आढावा जाहीर केला असून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कोणामुळे ढासळली हे जनतेला लवकरच समजेल, असे जारकीहोळी म्हणाले.
कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एक वर्षाचा कार्यकाळ यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. एक वर्षाच्या कार्यकाळातील काँग्रेसने केलेल्या कामकाजाचा आढावा जारकीहोळींनी जाहीर केला.
वर्षभराचा कार्यकाळ लोटल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा पुढे येत आहेत. याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आधीच स्पष्टीकरण दिले असून लोकसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याचे जारकीहोळींनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांना देण्यात येणारी नुकसान भरपाईची रक्कम कोणत्याही कारणास्तव थांबणार नाही, बेळगावमध्ये वाढलेल्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येसंदर्भात येत्या काही दिवसात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल, स्वच्छता कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यासाठी मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल, असे जारकीहोळी म्हणाले.
आज हुक्केरी तालुक्यात शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येप्रश्नी पोलिसांनी दाखविलेल्या दिरंगाईबाबत संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, कर्नाटकातील पाणीटंचाई असलेल्या भागात पाणीपुरवठा करण्यासाठी कोयना जलाशयातून पाणी पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हिरवा कंदील दाखविला असून २ टीएमसी पाणी पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागणीला अनुसरून लवकरच राजापूर बॅरेजमधून पाणी सोडण्यात येईल, अशी माहितीही जारकीहोळींनी दिली.