बेळगाव लाईव्ह : मराठा आरक्षणप्रश्नी महाराष्ट्रासह देशव्यापी आंदोलन हाती घेत लाखो मराठ्यांचा झंझावात उभा करणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी बेळगावात येऊन सीमाभागातील मराठा आणि मराठी भाषिकांना एकजुटीचा सल्ला दिला. सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवार दि. ३० एप्रिल रोजी धर्मवीर संभाजी उद्यानात भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत हजारोंच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी सीमावासीयांना मार्गदर्शन केले.
मनोज जरांगे पाटील यांचे सभास्थळी आगमन होताच घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. तत्पूर्वी बेळगाव शहरात दाखल झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात प्रतिमापूजन करून पुढे राणी कित्तूर चन्नम्मा चौकातून पुढे धर्मवीर संभाजी चौकात भव्य मिरवणुकीने वाजत गाजत जत्तीमठ मार्गे रामलिंग खिंड गल्ली, कपिलेश्वर उड्डाणपुलावरून छत्रपती शिवाजी उद्यानात शिवमूर्ती पूजन पार पडले. त्यानंतर बैलगाडीतून मनोज जरांगे पाटील यांचे भव्य स्वरूपात आगमन झाले. फटाक्यांची आतिषबाजी, पुष्पवृष्टी, संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. जरांगे पाटील यांचे बेळगाव शहरात जंगी स्वागत करण्यात आल्यानंतर सभास्थळी दाखल झाल्यानंतरही सीमावासीयांनी जोरदार घोषणा दिल्या.
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केवळ जेलमध्ये राहून लढा सोडविता येणे शक्य नसून लढा सोडविण्यासाठी लढण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. सीमावासीयांनी आपापसात एकजूट राखली तर येत्या सहा महिन्यात सीमाप्रश्न निकाली लागेल, असा विश्वासही जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.
सीमाप्रश्नाबरोबरच आपल्या इतर प्रश्नांसाठी लढा उभारण्यासाठी एकजुट महत्त्वाची आहे. एकजुटीने लढला तर कोणतेही आंदोलन यशस्वी होऊ शकते. आणि जर आपण केलेले आंदोलन यशस्वी झाले तर पुढच्या पिढीला संघर्ष करावा लागणार नाही. पुढच्या पिढीला संघर्ष करावा लागू नये यासाठी घाव सोसण्याची तयारी ठेवून रणांगणात उतरा, महाराष्ट्र तुमच्या पाठिशी आहे, असे ठाम मत जरांगे पाटलांनी व्यक्त केले.
मराठा हा एकदा जर रणांगणात उतरला तर तो माघारी फिरत नाही, हे आपण महाराष्ट्रात दाखवून दिले आहे. त्यामुळे खोटे आश्वासन मी देणार नाही. यामुळे सीमाभागातील मराठा समाजाने एकत्र यावे आणि हा लढा एकदाच लढावा, संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठिशी असेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
आपल्या आंदोलनाची पार्श्वभूमी सांगत सीमावासीयांनाही आंदोलनाची दिशा आणि स्वरूप कसे असावे याबद्दल जरांगे पाटलांनी मार्गदर्शन केले. आंदोलन यशस्वी करायचे असेल तर प्रामाणिकपणा आणि संघर्षाची तयारी पाहिजे. तेंव्हाच कोणतेही आंदोलन यशस्वी होते. तुम्ही सुरूवात करा. १०० टक्के महाराष्ट्रातील जनता तुमच्या पाठिशी असेल. आताच संघर्ष करा. त्यामुळे पुढील पिढीला संघर्ष करावा लागणार नाही. तुम्ही लेकरांना संकटात सोडून जावू नका, अशी भावनिक सादही त्यांनी घातली.
मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये आम्ही जे आंदोलन केले त्याची सुरुवात आपल्या कुटुंबापासूनच झाली. आंदोलनात उतरायचे असेल तर प्रथम कुटुंबाची साथ महत्वाची आहे. कुटुंब सोबत असेल तरच संपूर्ण समाज तुमच्या पाठिशी उभा राहतो. मी याच गोष्टी अंगिकारला त्यामुळे मला आंदोलनाला यश आले. महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर त्याची फळे मिळण्यास सुरूवात झाली आहे. आपल्याला जर कोणी विरोध करत असेल तर आपणही त्याला योग्य तो हिसका दाखविण्यास सज्ज असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये असलेल्या एकीच्या अभावामुळे लढ्याची धार कमी झाली आहे. लढा अधिक तीव्र करण्यासाठी सीमाभागातील मराठा समाजाने राजकारणापासून अलिप्त रहावे. प्रथम आपला प्रश्न सोडविण्यासाठी मैदानात उतरावे, असे त्यांनी सांगितले. सीमाप्रश्न हा अत्यंत महत्वाचा आहे मात्र तो किचकटही आहे. त्यामुळे प्रथम त्यासाठी अभ्यास करावा लागणार आणि त्यानंतर त्या प्रश्नावर घाव घालावा लागणार. तेंव्हा निश्चितच सीमाप्रश्नासाठी माझे योगदान राहिल, असे मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट केले. सीमाप्रश्नासंदर्भात लवकरच परिषद आयोजित करून यातील महत्वाचे मुद्दे काढून मोर्चेबांधणी सुरु करावी लागणार आहे. या लढ्यात आपण राजकीय म्हणून नव्हे तर सामाजिक स्तरावर नेतृत्व करण्यासाठी तयार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी सकल मराठा समाज आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सकल मराठा समाज, महाराष्ट्र एकीकरण समिती यासह सर्व मराठी भाषिक नेते, मान्यवर आणि मोठ्या संख्येने मराठा समाजातील बंधू भगिनींनी उपस्थिती दर्शविली.