बेळगाव लाईव्ह :उन्हाळ्याच्या सुट्टीतील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी नैऋत्य रेल्वेकडून रविवार दि. 12 मेपासून येत्या रविवार दि. 7 जुलै 2024 या कालावधीपर्यंत रेल्वे क्र. 07389/07390 बेळगाव -गोमतीनगर -बेळगाव ही उन्हाळी विशेष एक्सप्रेस रेल्वे सेवा दर रविवारी व मंगळवारी सुरू केली जाणार आहे.
रेल्वे क्र. 07389 बेळगाव ते गोमतीनगर उन्हाळी विशेष एक्सप्रेस रेल्वेसेवा येत्या रविवार दि. 12 मेपासून प्रारंभ होत आहे. सदर विशेष एक्सप्रेस रेल्वे येत्या 30 जून 2024 पर्यंत दर रविवारी याप्रमाणे एकूण 8 फेऱ्या करेल. त्याचप्रमाणे रेल्वे क्र. 07390 – गोमतीनगर ते बेळगाव ही उन्हाळी विशेष एक्सप्रेस रेल्वेसेवा मंगळवार दि. 14 मे 2024 रोजी प्रारंभ होत आहे.
ही रेल्वे येत्या 2 जुलै 2024 पर्यंत दर मंगळवारी याप्रमाणे परतीच्या एकूण 8 फेऱ्या करेल. सदर रेल्वेची रचना 2 -एसएलआर, 04 -जीएस, 08 – जीएससीएन, 02 -एसीसीएन, 1 -एसीसीडब्ल्यू अशी एकूण 17 कोचीस अशी असणार आहे.
रेल्वे क्र. 07389 बेळगाव ते गोमतीनगर उन्हाळी विशेष एक्सप्रेस रेल्वे येत्या रविवारपासून 8 मे पासून दर रविवारी दुपारी 12:30 वाजता बेळगाव येथून सुटेल. त्यानंतर लोंढा, धारवाड, हुबळी मार्गे मंगळवारी सकाळी 7:45 वाजता गोमतीनगर (लखनौ) रेल्वे स्थानकावर पोहचेल.
परतीच्या प्रवासात रेल्वे क्र. 07390 – गोमतीनगर ते बेळगाव उन्हाळी विशेष एक्सप्रेस रेल्वे येत्या मंगळवार 14 मेपासून दर मंगळवारी रात्री 8:30 वाजता गोमतीनगर (लखनौ) येथून सुटेल आणि हुबळी, धारवाड, लोंढा मार्गे गुरुवारी 3:15 वाजता बेळगाव रेल्वे स्थानकावर पोहोचेल.
बेळगाव पासून अयोध्येला जाणाऱ्या प्रवाशांना या रेल्वेचा लाभ होऊ शकतो.