बेळगाव लाईव्ह:दरवर्षी पावसाळ्यात बळ्ळारी नाल्याला येणाऱ्या पुराची आणि शेतकऱ्यांच्या वहिवाटीची समस्या निकालात काढण्यासाठी सांबरा आणि अलारवाड पुलाच्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे सर्व्हिस रोड अंडरग्राउंड बॉक्स युद्धपातळीवर घालण्यात यावेत, अशी मागणी नारायण सावंत यांच्या नेतृत्वाखालील बेळगाव शेतकरी संघटनेने केली आहे.
आपल्या मागणी संदर्भात आज बेळगाव लाईव्हला अधिक माहिती देताना बेळगाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत म्हणाले की, बळ्ळारी नाला ज्या ठिकाणी पुना -बेंगलोर राष्ट्रीय मार्गाच्या पुलाखालून वाहतो, त्या ठिकाणी नाल्यातील पाण्याचा निचरा होण्यासाठी करण्यात आलेले पाईप लहान आकाराचे आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात गाळ,केरकचरा अडकण्याद्वारे नाल्याला पूर येऊन आसपासची हजारो एकर शेत जमीन पाण्याखाली जाऊन पिकांचे कोट्यावधीचे नुकसान होत असते.
यासंदर्भात ज्यावेळी महामार्गाचे जेंव्हा रुंदीकरण करण्यात आले त्यावेळी म्हणजे 2003 पासून मी सरकार दरबारी तक्रार वजा मागणी करत आहे. पुना -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करतेवेळी त्याची उंची वाढवण्यात आली. मात्र ते करताना बळ्ळारी नाल्याचे पाणी रस्त्यात खालून या बाजूने त्या बाजूला जाण्यासाठी असलेले जुने लहान आकाराचे पाईप बदलण्यात आले नाहीत.
खरे तर तेंव्हा रस्त्याचे रुंदीकरण आणि वाढवलेली उंची याच्या हिशोबात मोठ्या आकाराचे पाईप किंवा सिमेंट काँक्रेटचे सर्व्हिस रोड अंडरग्राउंड बायपास बॉक्स घातले गेले पाहिजे होते. मात्र तसे झाले नाही त्यामुळे समस्या अशी झाली आहे की 300 फूट रुंदीच्या महामार्गाखालील नाल्याच्या लहान आकाराच्या पाईप्समध्ये मधोमध कचरा गाळ अथवा कांही अडकल्यास काहीच करता येत नाही.
लहान आकाराच्या पाईपमुळे तेथपर्यंत पोहोचताच येत नाही. महामार्गाची सुमारे 15 फूट उंची आणि पुला खालील लहान आकाराचे पाईप यामुळेच 4 वर्षांपूर्वी बेळगाव शहराला पुराचा तडाखा बसून पाणी नानावाडीपर्यंत गेले होते. यासाठीच आम्ही पावसाळ्यात बळ्ळारी नाल्यातील पाण्याचा सुलभ निचरा होण्यासाठी सिमेंट काँक्रेटचे बॉक्स घालण्याची मागणी केली होती.
पूर्वी पूना -बेंगलोर महामार्ग हा जेंव्हा एकेरी होता. त्यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांना सहजपणे रस्ता ओलांडून आपापल्या शेताकडे जाता येत होते. मात्र त्यानंतर महामार्गाच्या रुंदीकरणामुळे आणि त्यावर बसलेल्या दुभाजकामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतापर्यंत पोहोचणे गैरसोयीचे होत आहे.
महामार्गाच्या पलीकडच्या बाजूला असलेल्या आपल्या शेताकडे पायी जाण्यासाठी शेतकऱ्यांना दीड -दोन तास लागत आहेत. सदर रस्त्याची उंची वाढविल्यापासून आणि पुलाखालचे जुने पाईप खराब झाले आहेत. त्यामुळे पश्चिमेकडील बळ्ळारी नाला, लेंडी नाला व इतर नाल्यांचे पाणी पूर्वेच्या बाजूला जाणे कठीण होऊन बसले आहे.
सांबरा पूल ते अलारवाड पूल दरम्यानचा उंची वाढवलेला महामार्ग हा धरणाच्या भिंतीप्रमाणे झाला आहे. परिणामी पावसाळ्यात पश्चिमेकडील संपूर्ण शेती पाण्याखाली येऊन नष्ट होत आहे. सदर बॉक्स घातल्यास त्यामधून रस्त्याच्या एका बाजूच्या पाण्याचा दुसऱ्या बाजूला निचरा तर होतोच शिवाय उन्हाळ्यात माणसांनाही रस्त्याच्या दोन्ही बाजूला ये-जा करता येऊ शकते.
त्यानुसार 2004 मध्ये दोन बॉक्स मंजुरी झाले होते, तथापि माशी कोठे शिंकली माहिती अद्यापही त्या संदर्भात कार्यवाही झालेली नाही. या संदर्भात पाठपुरावा करताना गेल्या वर्षी देखील आम्ही आमची मागणी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या निदर्शनास आणून देऊन कोणत्याही परिस्थितीत हे बॉक्स घातले गेले पाहिजेत असे सांगितले होते.
एकंदर पूना -बेंगलोर राष्ट्रीय मार्गावरील सांबरा पूल व अलारवाड पुलाखालील जुने पाईप काढून त्या ठिकाणी या ठिकाणच्या जुने नाले व कालव्यांना जोडून सिमेंट काँक्रेटचे सर्व्हिस रोड अंडरग्राउंड बायपास बॉक्स घातल्यास या बॉक्समधून पावसाळ्यात नाल्यांच्या पाण्याचा सुलभ निचरा होण्यास मदत होणार आहे.
त्याचप्रमाणे उन्हाळ्यात नाले कोरडे पडल्यानंतर हे बॉक्स शेतकऱ्यांना एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी सोयीचे ठरणार आहेत. या पद्धतीने बहुउद्देशीय ठरणारे हे बायपास बॉक्स काळाची गरज असून ते घातलेच पाहिजेत, असे नारायण सावंत यांनी शेवटी स्पष्ट केले.