बेळगाव लाईव्ह : सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसुधारक विश्वासराव नारायणराव धुराजी यांचा अमृत महोत्सव बुधवार दि. २९ मे रोजी कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर (रिझ टॉकीज) येथे सायंकाळी ५.३० वाजता आयोजिण्यात आला आहे. २८ मे रोजी त्यांनी ७५ व्या वर्षात पदार्पण केले असून त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त निवृत्त प्राचार्या विनोदिनी मुरकुटे यांनी त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीचा घेतलेला आढावा…
विश्वास नारायण धुराजी आणि मी विनोदिनी मुरकुटे आम्ही आते मामे भावंड. परंतु आईचे माहेर हाकेच्या अंतरावर असल्यामुळे आम्ही नेहमी मामांच्या घरी रहात होतो. आम्ही सहा जण व विश्वास, शिवाजी असे आठ जन सख्या भावंडा प्रमाणे रहात असू. मामा त्यावेळी नगर पालिकेत नोकरीला होते.
घरी गाई, गुरे होती, मामा अतिशय हुषार होते. त्यावेळचे ते मुलकी पास होते. त्यांना पावकी निमकी दिडकी हे सर्व पाढे तोंडपाठ होते. श्री जोतिबाच्या किती तरी आरत्या त्यांना तोंडपाठ होत्या. काही आरत्या त्यांनी स्वताः ही रचल्या होत्या. घरात पोथ्यांचे वाचन, श्री जोतिबाची नियमित पायी वारी अशा वातावरणात विश्वासचे बालपण गेले. मामांचे अध्यात्मिक संस्कार नेहमी होत होते. त्यामुळे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्याने आपली वाटचाल पुढे ठेवली आहे. श्री जोतिबामंदिरात त्याची सतत सेवा असते. सर्व कामात पुढाकार असतोच. त्याच बरोबर विश्वासचा चिरंजीव रवी धुराजी हा ही हिरीरीने भाग घेतो. जवळ जवळ तीन पिढ्या श्री जोतिबाची सेवा सतत करीत आहेत.
विश्वासचा जन्म २८ मे १९५० साली झाला प्राथमिक शिक्षण सरकारी मराठी मुलांची शाळा नं. ०५ मध्ये झाले. माध्यमिक शिक्षण बेनन् स्मिथ हायस्कुल व कॉलेजचे शिक्षण गोगटे महाविद्यालयात झाले. १९७१ साली बहुजन समाजाने स्थापन केलेल्या मराठा को.ऑफ बँकेमध्ये नोकरी मिळाली. त्यांच्या प्रामाणिक पणामुळे १९८९ साली मार्कट यार्ड मधील शाखेत शाखा प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. २००५ साली बसवान गल्लीतील मुख्य शाखेत जनरल मॅनेजर म्हणून बढती झाली.
त्यादरम्यान बँकेचा एन. पी. ए. ४९% वर गेला होता. तो कमी करणे महत्त्वाचे होते. म्हणून संचालक मंडळ व सहकार्यांना विश्वासात घेवून बँकेचा एन. पी. ए. १८% वर आणला. या प्रसंगाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य मंत्री नामदार माननीय श्री शरद चंद्रजी पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
बँकींग क्षेत्रात काम करत असताना सामाजीक बांधीलकी म्हणून १९८९ सालापासून योग शिक्षकाचे काम मोफत पणे सुरू केले. बालमनावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून बेळगावात बाल संस्कार शिबिरे सुरू केली. जायंटस ग्रुप ऑफ बेळगांवचे ते अध्यक्ष म्हणून निवडले गेले. श्री मारूती मंगल कार्यालय व श्री जोतिबा मंदिरात ट्रस्टी म्हणून कार्यरत आहेत. निवृती नंतर श्री परूळेकर महाराज यांच्या दिंडीतून पायी पंढरीची वारी केली. मामांनी सांगितलेल्या पौराणिक कथा, चरित्रे, पोथ्या यांच्या श्रवणाने त्याच्यावर अनेक चांगले संस्कार झाले.
आई-वडिलांची सेवा त्याने अतिशय प्रेमळ पणाने केली. त्याच्या सर्व कार्यात त्याची पत्नी स्मिता विश्वास धुराजी म्हणजे माझ्या वहिणीने मोलाची साथ दिली. एका यशस्वी पुरूषाच्या मागे त्याच्या पत्नीची मोलाची साथ हवी असते. तशी साथ माझ्या वहिणीने, मुलगा रवीने व मुलगी उषाने दिली. त्यामुळे त्याच्या आयुष्याचे सार्थक झाले. ईश्वर त्याला उदंड आयुष्य देवो, उत्तम आरोग्य देवो, व ईश्वराची सेवा त्याच्या हातून सतत घडो ही ईश्वर चरणी प्रार्थना.