बेळगाव लाईव्ह : परिस्थिती कितीही हालाखीची असली तरी त्यातून मार्ग काढण्याची जिद्द असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळू शकते, हे आजवर अनेकांनी सिद्ध केलं आहे. परिस्थितीचा बाऊ न करता आपल्या जिद्दीच्या जोरावर यश मिळवणारा बेळगावचा कुणाल सुधीर पाटील हा विद्यार्थी यासाठी उत्तम उदाहरण ठरू शकेल.
वडील रिक्षाचालक, घरची परिस्थिती तशी साधारणच … परंतु या सर्वांवर मात करत बेळगावच्या कुणाल पाटील या विद्यार्थ्याने दहावी परीक्षेत घवघवीत यश संपादन करत कुटुंबीयांची मान उंचावली आहे.
आज कर्नाटक शिक्षण विभागाने दहावी परीक्षेचा निकाल जाहीर केला. या निकालात कुणाल पाटीलने ९३ टक्के गुण मिळविले आहेत. मराठा मंडळ संचलित सेंट्रल हायस्कुलमध्ये शिकणारा विद्यार्थी कुणाल पाटील याचे वडील सुधीर पाटील हे रिक्षा चालवतात.
शिवाजी नगर येथे वास्तव्यास असणाऱ्या या कुटुंबात दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आनंदी आनंद पसरला आहे.
घरची परिस्थिती बेताची असूनही या परिस्थितीवर मात करत आठवी ते दहावी या तिन्ही वर्षात कुणालने अभ्यासाचा आलेख नेहमी चढत्या क्रमांकावरच ठेवला आहे.
पालकांचा आधार, मुख्याध्यापक, शिक्षण वर्गाचे सहकार्य आणि मार्गदर्शन या गोष्टींमुळे आपल्याला हे यश मिळवता आलं अशी प्रतिक्रिया कुणाल पाटीलने दिली आहे. परिस्थितीचा अवडंबर न माजवता मिळविलेले यश हे इतर विद्यार्थ्यांना निश्चित प्रेरणा देणारे आहे.