बेळगाव लाईव्ह : कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या चिक्कोडी लोकसभा मतदार संघात काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. बेळगाव जिल्ह्याचा उपविभाग म्हणून परिचित असणाऱ्या या मतदार संघात भाजपकडून विद्यमान खासदार अण्णासाहेब जोल्ले तर काँग्रेसमधून प्रियांका जारकीहोळी यांच्या स्वरूपात नवे नेतृत्व निवडणूक रिंगणात उतरले आहे.
चिकोडी लोकसभा मतदार संघात भाजपमधून अण्णासाहेब जोल्ले हे दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. तर काँग्रेसने राजकारणात नवख्या असणाऱ्या प्रियांका जारकीहोळी या मांत्रिकन्येला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे चिकोडी लोकसभा मतदार संघाची लढत हि अस्तित्व आणि प्रतिष्ठेच्या मुद्द्यावर लढली जात असल्याचे स्पष्ट आहे. हि निवडणूक भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची दिसत असली तरीही काँग्रेसचे बंडखोर उमेदवार निवृत्त आयएएस अधिकारी शंभू कल्लोळकर यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत रायबाग मतदार संघातून ५५ हजार मते घेत दुसऱ्या क्रमांकावर त्यांना समाधान मानावे लागले होते. या निवडणुकीतही काँग्रेसने उमेदवारी डावलल्याने त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला असल्याने याचा फटका काँग्रेस उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे.
अण्णासाहेब जोल्ले यांनी २०१९ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार प्रकाश हुक्केरी यांचा १ लाख मतांच्या फरकाने पराभव केला होता. त्यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेळगावात सभा घेतली होती. मात्र या सभेला म्हणावा तसा प्रतिसाद जनतेने दिल्याचे जाणवले नाही. याचप्रमाणे हुक्केरी येथेही गृहमंत्री अमित शहा यांनी अण्णासाहेब जोल्ले यांच्यासाठी प्रचार सभा घेतली होती. या सभेला बऱ्यापैकी जनतेने गर्दी केल्याचे दिसून आले. भाजपचे फायरब्रॅन्ड नेते म्हणून परिचित असणारे बसनगौडा पाटील यत्नाळ यांनीदेखील जाल्लेंच्या प्रचारासाठी जोर लावला आहे.
दुसरीकडे राजकारणात नवख्या असणाऱ्या प्रियांका जारकीहोळी यांच्यासाठीही काँग्रेसने प्रचारात जोर लावला आहे. राजकारणात नवख्या असल्या तरीही प्रियांका जारकीहोळी यांच्या पाठीशी त्यांचे वडील आणि राज्यातील राजकारणाचा महत्वाचा दुवा मानले जाणारे सतीश जारकीहोळी यांचा वरदहस्त आहे. वडिलांच्या राजकीय कारकिर्दीमुळे प्रचाराच्या पहिल्या टप्प्यापासूनच प्रियांका जारकीहोळी यांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. प्रियांका जारकीहोळी यांच्यासाठी केंद्रीय नेते शरद पवार यांनी निपाणीमध्ये प्रचार सभा घेतली. शिवाय उत्तम पाटील यांनीही प्रियांका जारकीहोळी यांना पाठिंबा दिल्याने काँग्रेस प्रचाराला अधिक बळकटी आली. ४ मे रोजी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या देखील प्रियांका जारकीहोळी यांच्या प्रचारासाठी चिकोडीत दाखल होणार आहेत.
नवखी तरुण उमेदवार विरुद्ध विद्यमान खासदार अशी लढत होणाऱ्या चिकोडीच्या दोन्ही उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. गेल्या पाच वर्षात खासदारपदी विराजमान असलेल्या जोल्लेंनी निपाणी वगळता इतर भागात दुर्लक्ष केल्याचा जनतेचा आरोप आहे. मागील कालावधीत पत्नी शशिकला जोल्ले या मंत्रीपदी कार्यरत असूनही या भागाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याची नागरिकांची तक्रार आहे. या मतदार संघातील ग्रामीण भागाकडेदेखील दुर्लक्ष झाले असून निपाणी व्यतिरिक्त अथणी, कागवाड, चिकोडी, रायबाग आदी भाग दुर्लक्षित राहिले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
शिवाय उमेदवारीवरून सुरु असलेल्या नाराजीसत्रामुळे अप्रत्यक्षरीत्या विरोधात असणारे डॉ. प्रभाकर कोरे, महांतेश कवटगीमठ आणि रमेश कत्ती हे दिग्गज नेते प्रचारापासून अलिप्त आहेत. जोल्लेंनी लिंगायत समाजाव्यतिरिक्त इतर समाजाकडे देखील दुर्लक्ष केल्याने लिंगायत व्यतिरिक्त इतर समाजाचाही पाठिंबा नसल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे. याचप्रमाणे या मतदार संघात मोडणाऱ्या विधानसभा मतदार संघातील ८ पैकी केवळ ३ आमदार भाजपचे असल्याने आमदारसंख्याही कमी आहे. मोदी लाट आणि लिंगायत वोट बँकेच्या आधारावर जोल्ले वरचढ ठरू शकतील अशी शक्यताही व्यक्त होत आहे तर दुसरीकडे लिंगायत व्यतिरिक्त इतर समाजाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे एकहाती मतदार जारकीहोळींच्या दिशेने जाण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.
दुसरीकडे प्रतिष्ठेची लढत लढणाऱ्या प्रियांका जारकीहोळी या जारकीहोळी घराण्यातील राजकारणात उतरलेल्या पहिल्याच महिला आहेत. राजकारणाचा अनुभव नवीन असला तरीही वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची घोडदौड सुरु असल्याचे चित्र आहे. प्रियांका जारकीहोळी या गोकाकमधून असल्याने त्या दुसऱ्या मतदार संघातील उमेदवार असल्याचा शिक्का त्यांच्यावर आहे त्यामुळे राजकारणात त्यांचा टिकाव लागणे कठीण असल्याचे बोलले जात आहे. पण जमेची बाजू पाहता काँग्रेसकडे असलेले आमदारांचे संख्याबळ, राज्य सरकारच्या हमी योजना यामुळे प्रियांका जारकीहोळी यांचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे. या मतदार संघातील काँग्रेसचे आमदार गणेश हुक्केरी, लक्ष्मण सवदी, राजू कागे, सतीश जारकीहोळी, महेंद्र तम्मण्णावर आदींच्या पाठिंब्यामुळे चिकोडी मतदार संघात प्रियांका जारकीहोळी यांनी पहिल्या टप्प्यापासूनच आघाडी राखली आहे.
या मतदार संघात एकगठ्ठा मतदार असणारे पंचमसाली लिंगायत समाजाचे तब्बल ४ लाख मतदार आहेत. १.८० मराठा तर मागासवर्ग आणि मुस्लिम समाजाची मतेही निर्णायक आहेत. मतदारांची संख्या पाहता लिंगायत वोट बँकेचा आधार घेत, हिंदुत्व आणि मोदी लाटेचा फायदा जोल्लेना होईल असे दिसत आहे. परंतु लिंगायत मते वगळता इतर व्होटबँक पाहता एकहाती सत्ता जारकीहोळींच्या हाती येण्याचीही शक्यता आहे. जारकीहोळींच्या विजयासाठी काँग्रेस आमदार अहोरात्र झटत आहेत. मागासवर्गीयांची मते एकहाती मिळाली तर जारकीहोळींचा विजय निश्चित असल्याचेही राजकीय जाणकारांचे मत आहे.