बेळगाव लाईव्ह :पाणी टंचाईच्या सावटाखाली असलेल्या बेळगाव शहरासाठी 22.731 टीएमसी इतका लक्षणीय पाणी साठा असलेले हिडकल जलाशय दिलासा देणारे ठरले आहे. कारण या पाणी साठ्यापैकी 1.752 टीएमसी पाणी बेळगाव शहरासाठी सुरक्षित राखीव ठेवण्यात आले असून जे सध्याच्या शहरातील पाणी टंचाईवर मात करण्याचा उपाय ठरणार आहे.
हिडकल जलाशयांची क्षमता 51.16 टीएमसी असूनही बेळगाव शहराच्या पाण्याची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी या जलाशयाचे महत्त्व अधोरेखित होते. मागच्या पावसाळ्यात माफक पाऊस असतानाही हिडकल जलाशयातील सध्याच्या पाणीसाठ्याने गेल्या वर्षांच्या पातळीला ओलांडले असून ही बाब बेळगावच्या पाणी पुरवठ्यासाठी दिलासादायक आहे.
दुसरीकडे राकसकोप जलाशयाची स्थिती देखील सकारात्मक दिलासादायक आहे सध्याच्या दिवसात मागील वर्षाच्या तुलनेत या जलाशयात सुमारे दोन फूट अधिक पाणी आहे. त्यामुळे मे महिन्याअखेरपर्यंत शहराला पाण्याची कमतरता भासणार नाही असे अधिकाऱ्यांचे मत आहे. कारण जर का राकसकोपचे पाणी कमी पडले तर हिडकल जलाशयाचा विश्वासार्ह पर्याय आहेच. मागील वर्षाच्या तुलनेत हिडकल जलाशयाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय सुधारणा झाली आहे.
मागील वर्षी 9 एप्रिल रोजी या जलाशयात 13.30 टीएमसी इतका पाणी साठा होता, जो यंदा 20.711 टीएमसी जिवंत पाणी साठ्यासह एकूण तब्बल 22.731 टीएमसी इतका झाला आहे. हे सकारात्मक सूचक असूनही राकसकोप जलाशयाची अनिश्चित परिस्थिती लक्ष वेधून घेते.
त्याच्या मर्यादित क्षमतेमुळे दीर्घकाळापर्यंत पावसाळ्यात त्याचा जिवंत पाणीसाठा लवकर संपुष्टात येऊ शकतो, ज्यामुळे त्याच्या मृत साठ्यातून पाणी काढावे लागते. एकंदर दीर्घकालीन पाणी व्यवस्थापन धोरण राबविण्यासाठी प्रशासनाने आता शिरूर जलाशया सारख्या जलस्त्रोतांचा देखील विचार करावयास हवा.