बेळगाव लाईव्ह : स्मार्ट सिटी म्हणून बेळगाव शहराला कोणत्या दृष्टिकोनातून पाहायचे हा प्रश्न स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कामकाज सुरु झाल्यापासून बेळगावकरांना पडत आहे.
प्रश्नाचे उत्तर शोधण्यात बेळगावकर व्यस्त आहेत तर दुसरीकडे या प्रश्नांना भर पाडणाऱ्या गोष्टींमध्ये वाढ होत आहे त्यामुळे निरुत्तरित प्रश्नांची संख्या वाढत चालली आहे….!
स्मार्ट सिटीच्या अनागोंदी कारभाराचे वाभाडे याआधी अनेकवेळा उघड्यावर आले आहेत, मात्र आता यात कॉलेज रोडवरील गटारींची भर पडली आहे. यंदेखूट सर्कल मार्गे चन्नम्मा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या गटारींवर, फुटपाथच्या बाजूने काही ठिकाणी डेकोरेटिव्ह विद्युत खांब उभे करण्यात आले आहेत.
या विद्युत खांबांची वीजजोडणी करण्यासाठी काही ठिकाणी चेंबर सोडण्यात आले आहेत. मात्र कॉलेज रोड वरील याच चेम्बरची झाकणे उघडी असलेली दिसून आली असून या उघड्या चेंबरमुळे नागरिकांना धोका निर्माण झाला आहे.
सध्या उघड्यावर असलेल्या या चेंबरमध्ये कचरा टाकण्यात आला असून रात्रीच्यावेळी फुटपाथवरून जाणाऱ्या पादचाऱ्यांचा अलगद तोल जाऊन अपघात घडण्याचीही शक्यता आहे. यामुळे संबंधित अधिकारी अथवा कंत्राटदाराने याकडे तातडीने लक्ष पुरवून तोडगा काढण्याची आवश्यकता आहे.