बेळगाव लाईव्ह:ट्रॅफिक सिग्नलवर कर्तव्य बजावणाऱ्या आपल्या रहदारी पोलिसांसाठी आम्हाला बेळगावमध्ये अशा स्मार्ट ट्रॅफिक पोलीस बूथची गरज आहे.
सध्या उन्हाळा असून यावर्षी तापमान जास्त आहे. रखरखीत उन्हात आपण दररोजच रहदारी पोलीस वेगवेगळ्या सिग्नलवर उभे असलेले पाहतो.
आपण दुपारच्या वेळी एकदा उन्हात बाहेर जाऊन आलो की उष्म्याने आपल्या अंगाची काहीली काहीली होते. तेंव्हा दिवसभर उन्हामध्ये रहदारीचे नियंत्रण करत थांबणाऱ्या पोलिसांची अवस्था काय होत असेल हे सांगण्याची गरज नाही.
समाजाचा घटक असलेले आणि समाजाचे रक्षण करणाऱ्या या पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेणे सरकारचे कर्तव्य आहे. यासाठी कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील नागपूरचा आदर्श घेणे गरजेचे आहे.
त्या ठिकाणी रहदारी पोलिसांच्या छत्र्यांच्या ठिकाणी सोबतच्या छायाचित्रात दिसत असलेले स्मार्ट ट्रॅफिक पोलीस बूथ उभारण्यात आले आहेत.
उन्हाळ्यात गारवा आणि पावसाळ्यात ऊब देणारे असे बूथ आपल्या शहरात उभारल्यास बेळगाव शहरातील रहदारी पोलिसांना उन्हाळा आणि पावसाळ्यातही मोठा दिलासा मिळणार आहे.