बेळगाव लाईव्ह :ध्वज व ध्वजस्तंभाची देखभाल करण्याचे कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराचे सुमारे 6 लाख रुपयांचे बिल महापालिकेने थकवल्यामुळे त्याच्याकडून किल्ला तलावा जवळील सर्वात उंच राष्ट्रध्वज फडकविण्यात आलेला नाही, अशी माहिती महापालिका सूत्रांकडून मिळाली आहे.
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर दोन दिवसांनी किल्ला तलाव येथील ध्वज स्तंभावरील राष्ट्रध्वज फडकविणे बंद झाले आहे. याची माहिती मिळताच बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) शेठ यांनी महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे चौकशी केली.
त्यावेळी बिल थकविल्यामुळे कंत्राटदाराने काम बंद केल्याची माहिती बांधकाम विभागाकडून आमदार सेठ यांना देण्यात आली. त्यावर कंत्राटदाराचे बिल तातडीने अदा केले जावे व राष्ट्रध्वज पूर्ववत फडकविला जावा, अशी सूचना आमदारांनी केली होती. मात्र महापालिकेच्या बांधकाम विभागाने या साफ सूचनेकडे दुर्लक्ष केले आहे.
कंत्राटदाराला ध्वजस्तंभ व राष्ट्रध्वजाच्या देखभालीचे कंत्राट देण्याबरोबर कार्यादेशही देण्यात आला आहे. मात्र प्रारंभीच्या कांही महिन्यांचे बिल महापालिकेने कंत्राटदाराला दिलेले नाही. ते बिल कंत्राटदाराने बांधकाम विभागाकडे सादर केले असले तरी ते मंजूर झालेले नाही. त्यामुळे कंत्राटदाराने काम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
वादळी वाऱ्यामुळे राष्ट्रध्वजाचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आल्यावर कंत्राटदाराने गेल्या 18 मार्च रोजी राष्ट्रध्वज उतरवण्याचा निर्णय घेतला. त्याची माहिती त्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाला दिली. तेंव्हा नवा राष्ट्रध्वज आणून तो फडकवण्याची सूचना बांधकाम विभागाने केली.
तथापि नवा राष्ट्रध्वज मुंबई येथून आणावा लागणार आहे, शिवाय त्याची किंमत सुमारे 96 हजार रुपये इतकी आहे. त्यामुळे कंत्राटदाराने थकीत बिल अदा करण्याची मागणी केली आहे. थकीत बिलासाठी सदर कंत्राटदार गेल्या महिन्याभरापासून महापालिकेकडे पाठपुरावा करत असून त्याचे बिल अद्याप मंजूर झालेले नाही.