बेळगाव लाईव्ह:प्रत्येक वेळी कर्नाटकात येऊन पंतप्रधान मोदी भयंकर खोटे बोलून जातात. आपल्या खोटे बोलण्यामुळे मोदींनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा घालवली आहे. त्यामुळे खोटे बोलून तुम्हाला बकरा बनवणाऱ्या मोदींना पुन्हा अधिकारावर आणू नका, अशा शब्दात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान मोदींविरुद्ध आगपाखड केली.
कागवाड तालुक्यातील उगार खुर्द येथील विहार मैदानावर चिक्कोडी जिल्हा काँग्रेसच्यावतीने आयोजित कागवाड, अथणी, कुडची व रायबाग मतदार संघातील काँग्रेस पक्षाच्या प्रजाध्वनी -2 निवडणूक प्रचार सभेचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते.
बापरे इतके खोटे बोलण्याची मोदींना लाज देखील वाटत नाही, त्यांना मान मर्यादाच नाही असे सांगून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मोदींच्या खोटे बोलण्याचा पाढा वाचला. कित्तूर राणी जयंती साजरी करण्याचा आदेश देण्याचे काम मी केले जे बोम्मई आणि येडीयुराप्पा यांनी केले नाही. मी कधीही शिवाजी महाराजांचा अपमान केला नाही. मात्र हे मोदी ते देखील खोटं असल्याचे सांगतात. काँग्रेस राणी चन्नम्मा आणि शिवाजी महाराज यांचा अवमान करते असे ते खोटे सांगत आहेत.
खोटे बोलण्याला एक सीमा असली पाहिजे परंतु मोदी यांच्या बोलण्यात कारस्थान असते. आता मोदी मागासवर्गीय जाती समुदायांना मुस्लिमांविरुद्ध फडकविण्यासाठी भयानक खोटे बोलत आहेत. काँग्रेस मागासवर्गीयांच्या सवलती काढून घेऊन त्या मुस्लिमांना देणार असे भयानक खोटे सांगताना मोदींना लाज कशी वाटत नाही. प्रत्येक भारतीयाच्या खात्यात 15 लाख रुपये घालतो असे सांगून त्यांना लुटत आहात. वर्षाला 2 कोटी रोजगार उपलब्ध करून देतो असे सांगता आणि त्याबद्दल विचारना केल्यास भजी तळा असे सांगता, थूं तुम्हाला लाज कशी वाटत नाही? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी केला.
भाजप भारतीयांच्या भावनांशी खेळून आपला स्वार्थ साधत आहे. या उलट आम्ही काँग्रेसजन जनतेच्या जीवनातील समस्या कमी करणारे कार्यक्रम आखून ते राबवत आहोत. यावेळी केंद्रात काँग्रेस सत्तेवर येता क्षणी दरवर्षी प्रत्येक महिला घरमालकिनीच्या खात्यावर 1 लाख रुपये जमा होतील. देशभरातील सर्व शेतकऱ्यांची कर्जे माफ केली जातील. बेरोजगार युवक युवतींना लाख रुपयांचे सहाय्यधन दिले जाईल, अशा 25 गॅरंटी राहुल आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिल्या आहेत. त्यामुळे खोटे बोलून तुम्हाला बकरा बनवणाऱ्या मोदींना मते घालणार की तुमचे भले चिंतणाऱ्या आम्हाला मते घालणार याचा विचार करा, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.
यावेळी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आपल्या भाषणात भाजपवर टीका करण्याबरोबरच राज्यातील भाजप सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या गॅरंटी योजनांची माहिती दिली. जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आधी नेत्यांनीही आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी माजी मंत्री वीरकुमार पाटील, आमदार गणेश हुक्केरी, माजी आमदार काकासाहेब पाटील, श्याम घाटगे, मोहन शाह, चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव इंगळे, चिक्कोडी जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष निर्मला पाटील, काँग्रेस नेते सदाशिव भुटाळी, दिग्विजय पवार -देसाई, अनंतकुमार बॅकोड, रमेश सिंदगी, अर्जुन नायकवाडी, संजू माने सरकार, एनसीपी नेते उत्तम पाटील, अशोक मगदूम, महावीर मोहिते आदी नेते व्यासपीठावर उपस्थित होते.